Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र श्रावण सोमवार विशेष : हेमाडपंती स्थापत्यशैलीतील 'त्र्यंबकेश्वर' मंदीराबद्दल तुम्हाला 'हे' माहितीये का...

श्रावण सोमवार विशेष : हेमाडपंती स्थापत्यशैलीतील ‘त्र्यंबकेश्वर’ मंदीराबद्दल तुम्हाला ‘हे’ माहितीये का ?

Subscribe
मंदिराच्या निर्माणाच्या कालावधी एवढी मंदिरं

नानासाहेब पेशवे यांनी 1755-1786 या कालावधीत हेमाडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. या मंदिराचा जीर्णोद्धार 1755 मध्ये सुरू झाल्यानंतर 31 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर 1786 मध्ये तो पूर्ण झाला. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सुमारे 16 लाख खर्च झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी ही खूप मोठी रक्कम होती. भारत सरकारने या मंदिराला 30 एप्रिल 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चौफेर दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केलेली आहे. मंदिराच्या उत्तर व्दारावर मंदिर निर्माणाचा इतिहास शिलालेख स्वरूपात कोरून ठेवण्यात आला आहे. त्र्यंबक मंदिराच्या बांधकामासाठी जेवढी वर्षे लागली तितकी मंदिरे अमृत कुंंडाच्या बाजूला परिसरात बांधण्यात आलेली आहेत. दक्षिणव्दारातून दर्शन करून बाहेर पडल्यानंतर ही मंदिरे नजरेस पडतात.

ताम्रपत्रधारी गुरुजींचा इतिहास 

पौराणिक कथांनुसार ज्योतिर्लिंगापासून लगतच्या परिसरात पुण्यभूमी तयार झाली आहे, ज्यामुळे येथे केले जाणारे सर्व मनोरथ सफल होतात. भक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी अथवा दोषमुक्तीसाठी येथे विविध प्रकारचे जप-तप-व्रत करून भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी येतात. बाळाजी बाजीराव ऊर्फ श्री नानासाहेब पेशवे यांनी त्र्यंबकेश्वरमधील विविध पूजा करणारे ज्ञानसंपन्न पुरोहितांना ताम्रपत्र प्रदान केले. जे आजही पिढ्यान्पिढ्या संरक्षित केलेले आहेत. तेव्हापासून ताम्रपत्र प्राप्त गुरुजींना ‘ताम्रपत्रधारी गुरुजी’ म्हणून ओळखले जाते. ताम्रपत्र म्हणजे तांब्याच्या धातूने बनविलेल्या पत्र्यावर कोरलेले अधिकार पत्र. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरव मंदिरात उपस्थित गुरुजी अधिकृतरित्या ताम्रपत्रधारी असल्याने केवळ त्यांनाच पूजा करण्याचा विशेष परंपरागत अधिकार प्राप्त आहे. त्र्यंबकेश्वर व मंदिर परिसरात केले जाणारे धार्मिक अनुष्ठाने करण्याचा परंपरागत अधिकार स्थानिक गुरुजींकडेच आहे. काळापासून त्र्यंबकेश्वरमध्ये येणार्‍या भाविकांनी केलेल्या अनेक पूजांचे वर्णन या पिढ्यांनी जपून ठेवले आहे. येथे येणार्‍या यजमानांना पूजेची यथायोग्य माहिती व मार्गदर्शन हे या गुरुजींद्वारे केले जाते. अनेक काळापासून इथल्या मान्यवरांनी भाविकांच्या सोयीसाठी एकजूट होऊन कार्य केले. कालांतराने त्याचे रूपांतर ‘पुरोहित संघ’ नावाने नोंदणीकृत करण्यात आले. पूजा-अनुष्ठान करण्यासाठी येणार्‍या यजमानांना येथील अधिकृत गुरुजींची ओळख पटावी यासाठी ‘पुरोहित संघ’ सर्व गुरुजींना नोंदणीकृत प्रमाणपत्र बहाल करते. तसेच, ताम्रपत्राची काळजी घेते.

महाशिवरात्री, श्रावणात भाविकांची गर्दी 

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने बाराही महिने भाविकांची गर्दी असते. श्रावणी सोमवारी तर ही गर्दी अनेक पटींनी वाढते. महाशिवरात्री हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला असतो. पौराणिक संदर्भानुसार या दिवशी श्री शंकरांनी सृष्टीची रचना केली. त्याचप्रमाणे या दिवशी शिव-पार्वती विवाह झाला. हा पवित्र दिवस भक्तांसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिउत्तम मानला जातो. या पवित्र दिवशी भक्त कुशावर्त तीर्थावर पहाटे स्नान करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येतात. मंदिरात दर्शनासाठीची वेळ सकाळी ५.३० ते रात्री ९ पर्यंत असते तरीही या दिवशी मुख्य मंदिरात हा उत्सव दिवसाचे २४ तास साजरा होतो. पूजेत ज्योतिर्लिंगावर जलाभिषेक व रुद्राभिषेक होतो. अनेक प्रकारचे होम-हवन तसेच आरती या दिवशी केली जाते. अनेक भक्त या दिवशी रुद्रजाप करतात. प्राचीन परंपरेनुसार महाशिवरात्रीच्या एक दिवस अगोदर अनेक भक्त प्रदोष व्रत करतात.

त्र्यंबकेश्वर मंदिराची वैशिष्ठ्ये

 • एकमेव आश्चर्यकारक ज्योतिर्लिंग ज्याठिकाणी शिवलिंग नाही
 • इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची रचना वेगळी
 • त्र्यंबकेश्वर मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील मंदिर आहे
 • त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची रचना इतर ११ ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे
 • शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत
 • तीन कपारीत त्रिमूर्ती अर्थात ब्रह्मा-विष्णु-महेश” विद्यमान आहेत
 • गोरखनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे ९ नाथांना आणि ८४ सिद्धांना उपदेश केला होता
 • मंदिराच्या कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे
 • कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे
 • कुशावर्त तीर्थाचा जीर्णोध्दार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला
 • २६ डिसेंबर १७५५ रोजी मंदिर वास्तूचा शुभारंभ झाला
 • पेशव्यांचे प्रधान कारकुन नारायण भगवंत यांच्या देखरेखीखाली काम सुरू झाले
 • त्यांचा पुत्र नागेश नारायण यांनी ते काम पार पाडले
 • मंदिर निर्माणसाठी लागली ३१ वर्षे
 • वास्तूनिर्मितीसाठी ७८६ कामगार झटले
 • वास्तूशिल्पकार यशवंतराव हर्षे यांनी मंदिराचा आराखडा तयार केला
 • १६ फेब्रुवारी १७८६ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर निर्माण पूर्ण झाले
 • पूर्व पश्चिम २६५ फूट आणि दक्षिणोत्तर २१८ फूट लांबी रूंदी असलेल्या तटबंदीत शिवालय आहे
 • सकाळची पूजा दशपुत्रे घराण्याकडे, दुपारची पूजा शुक्ल परिवार आणि सायंपूजा तेलंग घराण्याकडे आहे
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -