Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र श्रीरामपूर नगरपालिकेचा ‘ऑनलाईन’गदारोळ

श्रीरामपूर नगरपालिकेचा ‘ऑनलाईन’गदारोळ

कोविड सेंटरवरून आरोप-प्रत्यारोपांनी गाजली सर्वसाधारण सभा

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.३०) प्रथमच श्रीरामपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. मात्र, सभागृहातील गदारोळ ऑनलाईन पाहवयास मिळाला. पालिकेने कोविड सेंटर सुरू करावे, या मागणी वरून सभा चांगलीच गाजली. उपनगराध्यक्ष करण ससाणे व ज्येष्ठ नगरसेविका भारती कांबळे यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना ‘बालिश’ संबोधले तर नगराध्यक्षांना प्रत्यूत्तरादाखल तोंड सांभाळून बोलण्यास बजावले.

नगराध्यक्षा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. वाढती रूग्णांची संख्या पाहता पालिकेने पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी कांबळे यांनी केली. तर नगराध्यक्षांनी तुम्ही जबाबदारी घ्या आणि सुरू करा, असे प्रत्यूत्तर देताच ससाणे यांनी संगमनेर व राहुरीचे उदाहरण देत आपल्याला का शक्य नाही, असा प्रश्न केला. आदिक यांचे हे बोलणे बालिश असल्याचा टोला कांबळे यांनी लगावताच भडकलेल्या आदिक यांनी तोंड सांभाळून बोलण्यास बजावले. जिल्हाधिकार्‍यांकडून परवानगी आल्यास आपल्यालाही कोवीड सेंटर सुरू करता येईल असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

संगमनेर रस्त्यावरील रिमांड होमच्या जागेवर शॉपींग कॉम्प्लेक्सचे आरक्षण असून, त्याठिकाणच्या अतिक्रमनाचा मुद्दयावर बरेच रणकंदन झाले. शेवटी अंजूम शेख व मुजफ्फर शेख यांनी अतिक्रमण असलेल्या टपरीधारकांचे पुनर्वसन करून इमारत बांधावी अशा सुचना केल्या.सण वार पाहून शनिवारी पाणी सोडले जावे, अशी सूचना कांबळे यांनी केली. करारानुसार टाऊन हॉल, वॉल कंपाऊंडचे काम ठेकेदाराने करणे गरजेचे होते. मात्र, आता दुसर्‍यांदा बील काढले जाऊ नये, असे श्रीनिवास बिहाणी सांगितले. घनकचरा व्यवस्थानाचा ठेका देऊन एक महिना होऊनही प्रभाग क्रमांक दोन मध्ये काम सुरू झाले नसल्याचा आरोप मुजफ्फर शेख यांनी केला. नगरसेवक राजेंद्र पवार यांनी सुयोग मंगल कार्यालयाचा मुद्दा उपस्थित केला. त्याची घरपट्टी भरली जाते का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सत्ताधार्‍यांनी काही सदस्यांचा आवाज जाणीवपूर्वक म्युट करुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप नगरसेविका स्नेहल खोरे यांनी केला आहे.

सत्ताधार्‍यांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना शहरातील अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच कामांचा डीएसआर वाढवून दिलेला आहे. तरीही, ज्या बाबींचा बाजारभाव अद्याप कमी आहे. अशा कामांचा भाव ठेकेदाराशी तडजोड करून कमी करून जनतेचा पैसा वाचवला जावा अशी मागणी बिहाणी यांनी केली.
ऑनलाईन सभेत निलोफर शेख, अक्सा पटेल, दिलीप नागरे, कलिम कुरेशी, प्रकाश ढोकणे, रवी पाटील, तरन्नूम शेख, जितेंद्र छाजेड, शामलिंग शिंदे, संतोष कांबळे, ताराचंद रणदिवे, मुख्तार शहा आदी नगरसेवक सहभागी झाले होते.

सुयोग मंगल कर्यालयाची करवसुली

- Advertisement -

श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सुयोग मंगल कार्यालयाची कर वसुली घरगुती दराने सुरू असल्याचा आरोप नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केला. व्यावसायिक कारणासाठी बांधण्यात आलेल्या या वास्तुची कर वसुली व्यावसायिक पद्धतीने का होत नाही, अशी विचारणा करून या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी पवार यांनी केली.

- Advertisement -