घरमहाराष्ट्रst workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचा ३० दिवसांचा विक्रमी संप, विलीनीकरणावर कर्मचारी...

st workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचा ३० दिवसांचा विक्रमी संप, विलीनीकरणावर कर्मचारी ठाम

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहे. या संपाला आज एक महिना पूर्ण झाला. मात्र पगारवाढीच्या आश्वासनानंतरही अनेक कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे विलीनीकरण आणि वेतनाच्या मुद्दावरून ८ नोव्हेंबरपासून सुरु असलेला संप अद्यापही सुरु आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप इतिहासातील विक्रमी संप असल्याचे म्हटले जातेय. एसटी महामंडळाच्या ६१ वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक दिवस चालणार हा संप ठरला. मात्र या संपामुळे महामंडळाचे थोडे थोडके नाही तर तब्बल ४५० कोटींहून अधिकचे आर्थिक नुकसान झाले.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे आणि वेतनवाढीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे सर्व एसटी डेपोमधील एसटी बसेसची वाहतूक बंद झाली.
अनेक बैठकांनंतर आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांची एक मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. याचदरम्यान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. परंतु सलग ३० दिवस राज्यात या आंदोलनाची धग जाणवत होती.

- Advertisement -

८ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनचा पवित्रा घेतला. यावेळी राज्यभरातील सर्वच एसटी डेपोमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याचा परिणाम सर्वसामन्य नागरिकांना सहन करावा लागला. यानंतर आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी ८ नोव्हेंबरला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समितीची स्थापना झाली. याचदरम्यान १२ नोव्हेंबरला विरोधी पक्ष भाजप आणि इतर पक्षांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उडी घेतली. यावेळी विरोधकांचा वाढता दबाव आणि आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा विचार करता २४ नोव्हेंबरला परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषण केली. यातच आज म्हणजे ८ डिसेंबरला या संपाला एक महिना पूर्ण झालाय.

एसटी संपावर तोडगा काढत राज्य सरकारने २४ नोव्हेंबरला पगारवाढीची घोषणा करत संप मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र तरीही अनेक कर्मचारी संपावर अडून होते. यावेळी सरकारने ९९१० आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तर रोजंदारीवर असलेल्या २०१४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. अशात आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला एक महिना पूर्ण होत असतानाही आजही अनेक कर्मचारी एसटीचे राज्य शासनात विलीन करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. अशातच सरकारने मेस्मा कायद्याअंतर्गत १२ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई करत सरकार आणि आंदोलक कर्मचाऱ्यांमधील संवाद संपुष्टात आणला. मात्र २० डिसेंबरला होणाऱ्या या प्रकरणाच्या न्यायालयीन आदेशाची अद्याप संपकरी कर्मचारी वाट पाहत आहेत.

- Advertisement -

३० दिवसांचा विक्रमी संप

एसटी महामंडळाच्या इतिहासातील हा जवळपास एक महिना चाललेला ऐतिहासिक संप ठरलाय. याआधी १९७२ साली कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांचा संप पुकारला होता. त्यानंतर १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेला हा पहिला संप आहे. २००७ मध्ये मॅक्सी कॅबच्या विरोधात कर्मचाऱ्यांची एक दिवसाचा संप केला होता. तर ऑक्टोबर २०१७ मध्ये चार दिवस एसटी कर्मचारी संपावर गेले होतेय याशिवाय जून २०१८ मध्ये सातव्या वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना अनेकदा वेतनवाढीसाठी संपाचे हत्यार उपसावे लागते हा एसटी महामंडळाचा इतिहास आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -