नाशिकमध्ये एस.टी. कर्मचार्‍याची आत्महत्या; आजवर तब्बल ३८ कर्मचाऱ्यांनी संपवले आयुष्य

आत्महत्येच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापात पडली भर

प्रातिनिधीक फोटो

नाशिकमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचा लढा सुरू असतानाच पेठ तालुक्यातल्या एका एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. गहिनीनाथ गायकवाड असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविषयीचा रोष आणखी वाढलाय. दरम्यान, आजवर तब्बल ३८ एसटी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या कारणांतून आत्महत्या केल्याचंही पुढे आलंय.

एसटी कर्मचार्‍यांचं आंदोलनं दडपण्यासाठी एसटी प्रशासन सक्रिय झालं असून, त्यांनी रोजंदारीवर कार्यरत ५१ कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवलीय. त्यात बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचं पाऊल उचलताहेत. जिल्ह्यातल्या पेठ आगारात कार्यरत गहिनीनाथ गायकवाड या एसटी बस चालकानं कमी वेतनामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आलीये. गायकवाडांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचं समजतंय. दुसरीकडे एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍यांनी त्यांचं आंदोलन आणखी तीव्र केलंय.