घरमहाराष्ट्रईडीची कागदपत्रे लीक होत असतील तर ते गंभीर, सुप्रिया सुळेंची पत्राचाळ प्रकरणी...

ईडीची कागदपत्रे लीक होत असतील तर ते गंभीर, सुप्रिया सुळेंची पत्राचाळ प्रकरणी प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. तर, ईडीची कागदपत्रे अशा प्रकारे लीक होत असतील तर, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील कथित गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत जेलमध्ये आहेत. याप्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात तपशीलवार मुद्दे मांडण्यात आले आहेत. त्यानुसार 2006 ते 2007 या काळात पुनर्विकासासंदर्भात झालेल्या काही बैठकांना म्हाडा अधिकाऱ्यांसह तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते तर, मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख होते. त्यामुळे संशयाची सुई शरद पवारांवर आहे.

- Advertisement -

हाच मुद्दा घेऊन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून मराठी माणसाला न्याय देण्याकरिता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरिता यासंदर्भात एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे हीच भूमिका भाजपाची राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असतो. रोजगार, महागाई, शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याकडे भाजपाचे लक्ष नाही फक्त सनसनाटी निर्माण करण्याकरीता भातखळकर यांचे पत्र आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.

तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जे आरोप करत आहेत, त्यांच्याकडे या संदर्भात काही कागदपत्रे आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. अशाप्रकारे ईडीची कागदपत्रे लीक होत असतील, तर ही देशासाठी अतिशय गंभीर बाब आहे. मला दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून याबाबत चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -