घरमहाराष्ट्रकसार्‍यात ‘माळीण’सारख्या दुर्घटनेचा धोका

कसार्‍यात ‘माळीण’सारख्या दुर्घटनेचा धोका

Subscribe

येथील पंचशीलनगर परिसरात घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने टेकडीवर वसलेल्या घरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कसारा गावातील पश्चिमेकडील डोंगराळ भागात तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांवर दरड कोसळण्याच्या भीतीचे सावट कायम आहे.

कसारा परिसरात पंचशीलनगर येथे 11जुलै 2019 रोजी टेकडीवर वसलेल्या घरावर दरड कोसळल्याने एक घर मातीच्या मलब्याखाली गाडले गेले. यात संपूर्ण संसाराचा गाडा मोडल्याने शिंदे कुटुंबावर मोठे संकट ओढवले गेले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामागे नैसर्गिक आणि मानवनिर्मित हस्तक्षेपाचा आणि कारणांचाच मोठा वाटा असल्याने दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण मोठ्या पावसात तीव्र उतारावरील माती आणि दगड खाली घसरून येऊ शकतात आणि चिकट मृदेचा लोट निसटून खडकांच्या दरडीपेक्षाही दूरपर्यंत वाहून येऊन वाटेत येईल त्या सगळ्या गोष्टींना व्यापू शकतो.

- Advertisement -

टेकडींवर वसलेल्या घरांमुळे पावसाळ्यात कोसळणार्‍या दरडींमुळे कसारा गावची वाटचाल माळीण दुर्घटनेच्या पुनरावृत्तीकडे होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. इथल्या टेकडींवर दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या मुसळधार पावसामुळे खाली कोसळण्याची भीती आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी या टेकड्यांवरील कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येतात. मात्र, ठोस उपाय होत नसल्याने ग्रामस्थांना आहे त्याच ठिकाणी दरडींच्या सावटाखाली रहावे लागते.

नागमोडी वळणे घेत चढणीवर एकावर एक वसलेली अनधिकृत घरे, अरुंद गल्लीबोळ्यांमुळे दुर्घटनेत मदत पोहचवणेही कठीण आहे. घरांच्या खिडकीतून थेट नाल्यात टाकला जाणारा कचरा असे चित्र इथल्या टेकड्यांवर पहायला मिळते. आनंदनगर, पंचशीलनगर, मिलिंदनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, पाटीलवाडी आणि तानाजीनगर परिसरातील या टेकड्यांवर गेल्या काही वर्षांपासून डोंगर पोखरून बेलगाम घरे उभारण्याचे काम चालू असल्याने लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. यामुळे टेकडीच्या पायथ्याला असलेल्या शेकडो घरांवर ’माळीण’ संकट ओढवण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

घरांचे जोते खचलेले
कसारा गावात टेकडीवर वसलेल्या घरांचे जोते आणि भिंती खचल्याने बरीचशी घरे धोकादायक स्थितीत आहेत.अशा लोकांनी पावसाळ्याच्या दिवसात सतर्कता म्हणून स्थलांतरित होणे अपेक्षित आहे. या भागात दुर्घटनेची शक्यता आहे. त्यासाठी ग्रामपंचायतने लेखी नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे.
-पी.एस.मार्के, ग्रामसेवक, मोखावणे कसारा ग्रामपंचायत

कसार्‍यात डोंगर खचण्याच्या घटना वारंवार होत आहेत. पुन्हा डोंगर खचून दरड कोसळण्याची शक्यता असल्याने वन विभागाशी संपर्क करून धोकादायक घरे रिकामी करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
-रविंद्र बाविस्कर, तहसीलदार, शहापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -