नाशकात मनसेला बळ देण्यासाठी राज ठाकरेंची अशी आहे रणनिती

मुंबईत आज प्रमुख पदाधिकार्‍यांशी केली चर्चा

Raj Thakrey

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसेने आता आपल्या कार्यकारिणीच्या रचनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार आता मनसेतील प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द होऊन याऐवजी शाखाध्यक्षपदाला महत्व प्राप्त होणार आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची मुंबईत बैठक घेत चर्चा केली.

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर मनसे पुन्हा एकदा सक्रिय झाली असून राज ठाकरेंनी मिशन नाशिक आखले आहे. मनसे नेते अमित ठाकरे, संदिप देशपांडे यांनी नाशिकमध्ये येत पदाधिकार्‍यांशी वन टू वन चर्चा केली. मंगळवारी मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना मुंबईत कृष्णकुंजवर पाचारण करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यात संघटनेच्या रचनेत फेरबदल करण्याचे सुतोवाच केले. त्यानूसार प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द होऊन याऐवजी शाखाध्यक्षपदाला महत्व प्राप्त होणार आहे. महापालिका निवडणूक प्रभागाऐवजी वॉर्डस्तरावरच होण्याची शक्यता अधिक आहे. फारतर दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असणार असल्याचे सुतोवाच शासन पातळीवरून दिले जात आहेत. वॉर्ड रचनेचा विचार करता मनसेनं प्रभाग अध्यक्ष रद्द करून त्याऐवजी शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्ष नियुक्त करण्याची रणनिती आखल्याचं बोललं जातंय. आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षपदावर जास्त फोकस ठेवला होता. तसेच प्रमुख पदाधिकार्‍यांशी स्वतंत्र संवाद साधून शहर संघटनावाढीसाठी काय करता येईल, याबाबतची मते जाणून घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहर अध्यक्ष अंकुश पवार, शॅडो कॅबिनेट,सचिव पराग शिंत्रे, नितिन साळवे, विक्रम कदम, सत्यम खंडाळे, संदीप भवर आदी उपस्थित होते.