घरमहाराष्ट्रकसबा, चिंचवडमध्ये तिरंगी लढत, बंडखोर राहुल कलाटे, आनंद दवेंचा माघारीस नकार

कसबा, चिंचवडमध्ये तिरंगी लढत, बंडखोर राहुल कलाटे, आनंद दवेंचा माघारीस नकार

Subscribe

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनधरणी करूनदेखील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला, तर दुसरीकडे हिंदू महासभेचे आनंद दवे यांनीदेखील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याचा इरादा कायम ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. कसबा पेठमध्ये १६ उमेदवार रिंगणात असून चिंचवडमध्ये ३१ उमेदवार पोटनिवडणूक लढवत आहेत.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी येत्या २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी शेवटची मुदत होती. चिंचवडमध्ये ठाकरे गटाच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे. कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी मनधरणी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे तसेच अजित पवार यांनीही फोनवरून त्यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. तरीही कलाटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. त्यामुळे चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची डोकेदुखी वाढली आहे. येथून भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

तर कसबा पेठमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या फोननंतर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, परंतु भाजपने कसबा पेठेत टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यामुळे येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि महासंघाचे आनंद दवे यांच्यात तिरंगी लढत होईल. दवे यांची उमेदवारी भाजपला अडचणीची ठरू शकते.

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत थोरातांचा समावेश
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

स्टार प्रचारकांची यादी जाहीर
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची फौज उतरवण्यात येणार आहे. भाजपच्या ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दरेकर हे महत्त्वाचे चेहरे असणार आहेत. राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खासदार अमोल कोल्हे असे नेते प्रचार करतील, तर काँग्रेसकडून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण प्रचाराची धुरा सांभाळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -