शिर्डी त्र्यंबकेश्वरात काकड आरती नाही; आजचा दिवस हिंदूंसाठी ‘काळा दिवस’, संजय राऊतांचा मनसेला टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगत मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण करू असा इशारा दिला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगत मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण करू असा इशारा दिला. शिवाय हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्यामुळे मंदिर असो वा मशिद सर्व भोंगे हे उतरवले गेलेच पाहिजेच असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक मशिदींमध्ये सकाळची अजान झाली. शिवाय शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर येथे काकड आरती झाली नाही. त्यामुळं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसंच, “आजचा दिवस हिंदूंसाठी ‘काळा दिवस’ आहे आणि मनसेचा भोंगा मनसेवरच उलटणार आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“भाजपाला ज्या गोष्टी जमत नाहीत त्या लहान पक्षांना हाताशी घेऊन केल्या जात आहेत. भाजपाने राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी करुन घेतला. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव आखला जातोय. याचा सर्वाधिक फटका हिंदूंना बसला आहे. पहाटेच्या काकड आरतीला अनेक मंदिरांमध्ये केवळ मोजक्या लोकांनाच उपस्थित राहता येत असतं. पण मंदिरांवरील लाऊडस्पीकरवरुन परिसर आणि गावातील लोक काकड आरतीचे साक्षीदार होत असतात. या आंदोलनामुळे हिंदू मंदिरांमध्ये काकड आरती झालेली नाही. याची नाराजी अनेक हिंदूंनी आमच्याकडे व्यक्त केली. आज राज्यात शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसारख्या पवित्र धार्मिक स्थळांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“भोंग्याचा वाद हा धार्मिकच असून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. त्यांनी याआधी मराठीच्या मुद्द्यावरुन मराठी माणसांमध्ये फूट पाडली. आता ते हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. आज पुन्हा एकदा भाजपाने त्यांच्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी दिला आहे. हे भोंग्यांचं आंदोलन मनसेवरच उलटणार आहे”, असं राऊत म्हणाले.

“मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हा एवढा मोठा मुद्दा नव्हता. पण त्यांच्या आंदोलनामुळे आज मशिदींसह हिंदू मंदिरांनाही पहाटे आपली काकड आरती करता आलेली नाही. तसंच अनेक हिंदू मंदिरांनीही लाऊडस्पीकरच्या परवानगीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. पण इतक्या कमी कालावधीत परवानगी देणं पोलिसांनाही शक्य नाही. राज्यात ज्या ठिकाणी दररोज हजारो, लाखो भाविक भेट देत असतात अशा पवित्र हिंदू मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

“शिर्डीतल्या लोकांनीही नाराजी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वरातही अशीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी भजन, किर्तनाचे कार्यक्रम होते. पण ते रद्द करावे लागले. याला जबाबदार हे आताचे नवहिंदू ओवेसी आहेत. हिंदुत्वासाठी आणि श्रद्धावंतांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे आणि उद्या लाऊडस्पीकरच्या मागणीसाठी हिंदू रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ का वापरला?