घरमहाराष्ट्रराज्यातील शाळा उद्या राहणार बंद

राज्यातील शाळा उद्या राहणार बंद

Subscribe

नवीन आकृतीबंधाच्या निषेधार्थ उद्या (शुक्रवारी) १८ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला आहे. सध्या राज्यातील १६ हजार ६२० शाळा सुरू आहेत. या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिक्षण क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर महामंडळ शासनासोबत चर्चा करीत आहे. परंतु अनुदान आणि इतर कोणत्याही विषयांवर शासनाकडून सकारात्मक निर्णय होत नाही. शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, कामाठी, तेलवाला, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा भविष्यात कायम स्वरुपी संपवून त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता तुटपुंज्या वेतनावर त्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करावी, असा आदेश दिनांक ११ डिसेंबरला काढला. खासगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी ही पदे मार्च २००३ मध्ये पायाभूत करण्यात येऊन वित्त विभाग तथा शिक्षण विभागाने त्यास मान्यता दिली आहे. आज रोजी राज्यात याच पायाभूत पदांना आर्थिक तरतूद करण्यात येते आणि त्यानुसारच दरवर्षी ५२ हजार पदांना अनुदान देखील वितरीत होते. मागील अनेक वर्षांमध्ये यातील बरेच पदे सेवानिवृत्ती आणि अकस्मात मृत्यूने रिक्त झाली आहेत, किमान त्यातीलच उर्वरित रिक्त पदांना राज्यात भरतीची परवानगी दिली तर राज्य शासनावर कसलाही आर्थिक बोजा होत नाही आणि शिक्षण व्यवस्था अत्यंत सुरळीत राहू शकते.

- Advertisement -

‘ड’ संवर्गातील चतुर्थ श्रेणीतील पदे देखील खूप महत्त्वाची असून शाळा स्वच्छता, शाळा सुरक्षा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुरक्षा, कार्यालयीन कामकाज इत्यादीमध्ये यांचे फार मोठे योगदान आहे. राज्यात मागासवर्गीय ५२ टक्के अनुशेषाच्या सेवा संपुष्टात आणल्या जात आहेत. यापुढे या संवर्गात अनुशेष कधीच राहणार नसून एक प्रकारे आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीतून पिछाडलेल्या घटकांना यापासून १०० टक्के वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. आज या धोरणामुळे चतुर्थ श्रेणी मध्ये काम करणाऱ्यांच्या सेवेस पूर्णविराम देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने उद्या  (शुक्रवार) दिनांक १८ डिसेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणीक शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी दिली.


हेही वाचा – शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा समावेश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -