कळव्यात स्लॅब कोसळल्याने दोन चिमुकले जखमी

ठाण्यातील कळवा, विटावा सुर्या नगर येथील श्री साईनिवास बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर १०४ च्या स्लॅबचे प्लास्टर पडले असून यामुळे कॉलमला देखील तडे गेल्याची घटना शनिवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन चिमुकले जखमी झाले आहेत.

Two minors injured due to slab collapse in Kalva

ठाण्यातील कळवा येथे असलेल्या विटावा सुर्या नगर येथील श्री साईनिवास बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर १०४ च्या स्लॅबचे प्लास्टर पडले असून यामुळे कॉलमला देखील तडे गेल्याची घटना शनिवारी सकाळी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत, अक्षित आशिष सिंग (वय वर्ष ४) आणि आर्या (वय वर्ष ७) हे भाऊ बहीण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर या दोघांनाही उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांना किरकोळ दुखापत झाली असून स्लॅबचे प्लास्टर पडलेली रूम रिकामी करण्यात आली आहे. तसेच रूमला सील करून त्या रहिवाशांनी नातेवाईकांकडे हलविण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती प्रभाग समितीकडून देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा विटावा येथे असलेले श्री साईनिवास बिल्डिंग ही तळ अधिक चार मजली असून ती १५ वर्षे जुनी आहे. तेथे एकूण ४५ कुटुंब वास्तव्यास आहेत. पहिल्या मजल्यावर रूम नंबर १०४ ही गौतम शहा यांच्या मालकीची असून त्यांनी ती रूम आशिष सिंग यांना भाड्याने दिली आहे. त्याच रूमच्या स्लॅबचे प्लास्टर पडले असून कॉलमला देखील तडे गेले आहेत.

या घटनेत दोन लहान मुले जखमी झाल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी कळवा कार्यालयीन अधीक्षक सोपान बाईक यांच्यासह बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उप- अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (कळवा प्रभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांनी धाव घेतली आणि जखमी झालेल्या मुलांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये अक्षीत याच्या डोक्याला आणि कानाला तर आर्या हिच्या डोक्याला आणि कमरेला किरकोळ दुखापत झाली आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

हेही वाचा – “नामांतराचा निर्णय घेताना गद्दार तिथे नव्हते”; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल

दरम्यान, गुरुवारी (ता. २३ फेब्रुवारी) ठाण्यातीलच नौपाडा येथे नवीन इमारतीची पायाभरणी सुरु असताना मातीचा ढिगारा नागावर कोसळल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांचा गोंधळ उडाला होता.