घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार होते! शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा...

उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडणार होते! शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा पुनरुच्चार

Subscribe

मुंबई : महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर सुद्धा तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. यासंदर्भात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठकही झाली होती. पण त्यांनी ऐनवेळेला निर्णय फिरवला, असा पुनरुच्चार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गुरुवारी केला.

महाराष्ट्रातील जनतेला अर्धवट सत्य का सांगता? संपूर्ण सत्य का सांगत नाही? असे सवाल करत राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मीच घडवून आणली होती. त्यावेळी पंतप्रधान भेटही देत नव्हते. तेव्हा तुमची पंतप्रधानांशी भेट घडवून आणली. तुमची तिथे बोलणीही झाली. घडलेले चुकीचे आहे. हे सुधारले गेले पाहिजे, अशी कबुली तुम्ही दिली होती. हे तुम्ही लोकांना का सांगत नाही? तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. पुन्हा भाजपसोबत युती करणार होते, असे ते उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.

- Advertisement -

मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असे कबूल करून उद्धव ठाकरे दिल्लीहून आले होते. मुंबईत गेल्याबरोबर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो, असेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले होते. पंतप्रधानांनी तत्काळ राजीनामा मागितला नव्हता. तुम्हाला वाटेल तेव्हा राजीनामा द्या, असे मोदी म्हणाले होते. राजीनामा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही वेळ हवा होता. सर्वांची समजूत घालण्यासाठी त्यांना वेळ हवा होता. त्यांना पुरेसा वेळ दिला होता. अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रिपद सोडायचे असेल तर, तो पर्यायही त्यांच्याकडे होता.. पण, राष्ट्रवादी काँग्रेस मला पाच वर्षं मुख्यमंत्रिपद द्यायला तयार आहे. तुम्हीही पाच वर्ष द्या, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र हे बरोबर नव्हते, असेही केसरकर म्हणाले.

आता खोट्या सहानभूतीसाठी उद्धव ठाकरे बोलत आहेत. विनाकारण त्यांनी खोट्या सहानुभूतीसाठी खटाटोप करू नये. तुम्ही जे कबूल केले, ते का अमंलात आणले नाहीत? काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भेटल्यानंतर तुमचे मन का बदलले ते सांगा? असे सवालही केसरकर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -