विवेक रहाडे आत्महत्या प्रकरण; मराठा आरक्षणासंदर्भातील सुसाईड नोट बनावट

Vivek Rahade Suicide Note Fake
विवेक रहाडेची सुसाईड नोट बनावट असल्याचा दावा

बीडमधील विवेक रहाडे या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याने वैद्यकीय प्रवेशासाठी असलेली नीट परिक्षा अवघड गेल्यामुळे काही दिवसांपुर्वी नैराश्यातून आत्महत्या केली होती. विवेकच्या सुसाईड नोटनंतर महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला. मात्र विवेक रहाडेच्या आत्महत्येला आता धक्कादायक वळण लागले आहे. त्याची सुसाईड नोट बनावट असून विवेकच्या मृत्यूनंतर त्याचा फायदा घेण्यासाठी ती कुणीतरी दुसऱ्यानेच लिहिली असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता पोलिसांनी सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीड ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तीन नमुन्यातून या सुसाईड नोटचे हस्ताक्षर तपासून पाहिल्या नंतर ही नोट बनावट असल्याचा निष्कर्ष काढला. ३० सप्टेंबर रोजी विवेक कोरडे या १८ वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर ही आत्महत्या मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे झाली असल्याचा आरोप करण्यात येत होता. या आशयाची सुसाईड नोट देखील नातेवाईकांनी समोर आणली होती.

प्रकरण काय आहे?

विवेकने ३० सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला होता. मात्र त्यादिवशी त्यांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही. मात्र त्यानंतर विवेक वापरत असलेल्या रजिस्टरमधून ही सुसाईड नोट अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाली. सुसाईड नोट व्हायरल होताच, मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली. यानंतर पोलिसांनी हे रजिस्टर ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला.

या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले हस्ताक्षर आणि विवेकच्या हस्ताक्षराचा काही मेळ बसतो का? हे तपासण्यासाठी पोलिसांनी विवेकच्या शाळा-कॉलेजमध्ये असताना त्याने सोडविलेल्या उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या. दोन्ही हस्ताक्षर तपासल्यानंतर सुसाईड नोटमधील हस्ताक्षर दुसऱ्याचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ही सुसाईड नोट लिहून कुणीतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी याविरोधात गुन्हा दाखल केला.