घरदेश-विदेशसहाव्या जागेचा आज फैसला, राज्यसभेसाठी मविआ-भाजपची प्रतिष्ठा पणाला

सहाव्या जागेचा आज फैसला, राज्यसभेसाठी मविआ-भाजपची प्रतिष्ठा पणाला

Subscribe

राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल. मतदारांना पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत असून त्यासाठी विधानभवन सज्ज झाले आहे. मतदानानंतर लगेच तासाभरात मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल शुक्रवारी घोषित होईल. राज्यसभा निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली असून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांना त्या त्या पक्षांनी एकत्र हॉेटलमध्ये ठेवले होते. त्यामुळे सहाव्या जागेवर कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून आघाडीसमोर आव्हान निर्माण केले आहे. हे आव्हान परतवून लावण्यासाठी महाविकास आघाडीने सज्जता ठेवली आहे. आघाडीचे आणि आघाडीला साथ देणारे आमदार भाजपच्या गळाला लागू नयेत म्हणून आघाडीने आपल्या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवली आहे. भाजपचे आमदार आलिशान हॉटेलमध्ये आहेत. या सर्व आमदारांना मतदानापूर्वी विधान भवनात विशेष बसने आणले जाईल.

- Advertisement -

सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत. ठाकरे हे अपक्ष आमदारांच्या, तर पवार छोट्या पक्षांच्या संपर्कात आहेत. भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे.

वैध मतांवर ठरणार कोटा
राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेतील २८७ आमदार मतदानासाठी पात्र आहेत. पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्ष मतदान होऊन वैध मतांवर विजयी उमेदवाराचा कोटा निश्चित होईल. मतदारांना पहिल्या पसंतीचे मत देणे बंधनकारक आहे. पहिल्या पसंतीचे मत नसेल, तर मतपत्रिका अवैध ठरेल. पहिल्या पसंतीनंतर मतदाराला दुसर्‍या, तिसर्‍या पसंतीची मते देता येतील. पसंतीच्या मतांवर सहाव्या उमेदवाराचे भवितव्य ठरणार असल्याने आमदारांना मतदानाची तांत्रिक प्रक्रिया समजावून दिली जात आहे.

- Advertisement -

राज्यसभेसाठी खुले मतदान आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदान करण्यापूर्वी आपली मतपत्रिका पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधींना दाखवावी लागेल. अपक्ष आमदारांना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. तब्बल २४ वर्षांनंतर राज्यसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. विधानसभेतील निम्म्याहून अधिक सदस्य पहिल्यांदा राज्यसभेसाठी मतदान करणार आहेत.

कोरोनाबाधित आमदारांसाठी विशेष व्यवस्था
कोरोनाबाधित आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आमदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर मतदान करता येईल. त्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार कोरोनाबाधित असेल तर त्यांना मतदानाला येताना पीपीई कीट घालून यावे लागेल. दरम्यान, आमदारांपैकी कोण कोरोनाबाधित आहे किंवा कोण नाही याची माहिती अद्याप निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात आलेली नाही.

निवडणुकीतील उमेदवार

भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे, धनंजय महाडिक

शिवसेना : संजय राऊत, संजय पवार

राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल

काँग्रेस : इम्रान प्रतापगढी

#सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान

# सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होऊन निकाल घोषित करणार

राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलैला मतदान निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. त्यानुसार राष्ट्रपतिपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होईल, तर २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल. विधानसभांचे ४१२० आमदार, लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार असे एकूण ४८९३ मतदार राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करतील.

राष्ट्रपतिपदासाठी सध्या ५ नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन आणि झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू या पाच जणांचा समावेश आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
नोटिफिकेशन जारी – १५ जून
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून
अर्ज छाननी – ३० जून
अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै
मतदानाचा दिवस – १८ जुलै
मतमोजणी – २१ जुलै

विधान परिषदेच्या १० जागांसाठी १३ अर्ज

सदाभाऊ खोत भाजप पुरस्कृत उमेदवार

 विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारच्या अखेरच्या दिवशी १० जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजपचे संख्याबळ पाहता ४ उमेदवार निवडून जाऊ शकतात, मात्र अखेरच्या दिवशी सदाभाऊ खोत यांनी भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने भाजप उमेदवारांची संख्या ६ झाली आहे.विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत होती, मात्र नाट्यमय घटना घडत गेल्याने अखेरच्या दिवशी अतिरिक्त अर्ज भरले गेले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवाजी गर्जे यांचा अतिरिक्त अर्ज दाखल केला आहे, तर भाजपच्या ५ उमेदवारांनंतर सहावा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी भाजप पुरस्कृत अर्ज भरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सदाभाऊ खोत यांना सहावे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दोनऐवजी तीन उमेदवारी अर्ज भरले असले तरी शिवाजी गर्जे यांचा अर्ज अतिरिक्त असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे, मात्र भाजप कोणाचा अर्ज मागे घेणार याबाबत उत्सुकता आहे. सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे घेण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस : रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवाजी गर्जे

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -