घरताज्या घडामोडीवारिस पठाण यांनी अखेर 'ते' विधान घेतलं मागे!

वारिस पठाण यांनी अखेर ‘ते’ विधान घेतलं मागे!

Subscribe

एमआयएमचे वारिस पठाण यांनी अखेर त्यांचं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी आमदार आणि मुंबईतील नेते वारिस पठाण यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून त्यांच्यावर आणि एमआयएम पक्षावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. मात्र, अखेर या टीकेनंतर वारिस पठाण यांनी त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. तसेच, ‘मी सच्चा देशभक्त आहे’, असं देखील वारिस पठाण यांनी सांगितलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील हे देखील उपस्थित होते.

काय म्हणाले होते वारिस पठाण?

कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये काही दिवसांपूर्वी वारिस पठाण यांनी भाषणादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ईंट का जवाब पत्थरसे देना सीख लिया है हमने. बस साथ में चलना पडेगा. आजादी लेनी पडेगी, अगर मांगने से नहीं मिलती तो छीनकर लेनी पडेगी. आम्हाला म्हटलं गेलं, आया-बहिणींना पुढे केलं (शाहीन बाग आंदोलन), पण त्यांना सांगेन की आत्ता फक्त वाघिणी बाहेर पडल्या आहेत, तितक्यात तुम्हाला घाम फुटला. जर सगळे बाहेर पडलो, तर काय होईल? आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींवर भारी आहोत, हे लक्षात ठेवा’, असं वारिस पठाण यावेळी स्टेजवरून म्हणाले होते.

- Advertisement -

वाचा सविस्तर – MIMचे वारिस पठाण बरळले, म्हणे ‘आजादी छीन के लेनी पडेगी’!

काय केला खुलासा?

यावर खुलासा देताना वारिस पठाण पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, ‘माझ्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत. असं चित्र उभं केलं जात आहे की मी देशद्रोही आहे. गुलबर्गमध्ये मी जे म्हणालो, त्याचा हा अर्थ अजिबात नव्हता की मी ते हिंदूंबद्दल बोललो. माझा म्हणण्याचा हाच हेतू होता की १५ कोटी मुस्लिमांसोबत संविधानावर विश्वास असलेली इतरही लोकं नाराज आहेत. देशातले फक्त १०० लोकं असे आहेत जे १५ कोटी मुस्लिमांविरोधात दिसत आहेत. मग ते कुठल्याही पक्षाचे असोत. मी या १०० लोकांचाच उल्लेख केला होता. या १०० लोकांमध्ये काही पत्रकार देखील आहेत. हे लोकं देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. मी एक सच्चा मुसलमान आहे, देशभक्त आहे. माझ्या देशभक्तीबद्दल कुणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मी कधीही कोणत्या धर्मावर टीका केलेली नाही. मी सगळ्या धर्मांचा आदर करतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. पण तरीही जर माझ्या शब्दांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द मागे घेतो. फक्त मी या देशाचा सच्चा नागरिक आहे म्हणून मी हे करतोय’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -