घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही

मुख्यमंत्र्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही

Subscribe

पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांचा नाराजीचा सूर

‘मुख्यमंत्र्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही’, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी काहीसा नाराजीचा सूर आळवला. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सोमवारी राज्याच्या पर्यटन विभागाने एका छोटेखानी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पर्यटन विकासाला गती देणार्‍या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध प्रकल्पांचा शुभारंभ करताना त्यात वेळेचा बराच अपव्यय झाला. एकत्रितपणे सर्व प्रकल्पांचा शुभारंभ न करता एकेका प्रकल्पाची घोषणा करून नंतर मान्यवरांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून शुभारंभ केला जात होता. त्यावरून अजित पवार यांनी नंतर निवेदिकेची फिरकी घेतली. ‘कार्यक्रमात आज सुरुवातीपासून मी बारकाईने बघतोय. निवेदिकेने इतक्यांदा मुख्यमंत्र्यांना बसा उठा करायला लावलं… मुख्यमंत्री उठायचे तेव्हा मग आम्हालाही उठायला लागायचं आणि परत बसायला लागायचं.

- Advertisement -

एकदाच काय ते सांगितलं असतं तर… आता याचं बटण दाबा, आता पुढचं बटण दाबा… म्हणजे सगळं एकाचवेळी संपलं असतं; पण तुम्हाला कोण सांगणार. तुमच्या हातात माईक असल्यावर आम्हाला काही बोलताही येत नाही आणि मुख्यमंत्र्यांच्यापुढे आमचं काही चालत नाही’, अशी काहीशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भाषणासाठी आमंत्रित करण्यापूर्वी मान्यवरांना सतत उठ-बस करावी लागल्याबद्दल निवेदिकेने दिलगिरी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे आणि आदिती तटकरे यांच्या कामाचे यावेळी अजित पवार यांनी कौतुक केले. सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना घेऊन आपण आजचा पर्यटन दिन साजरा करत आहोत, असे सांगताना अर्थमंत्री म्हणून पर्यटन विकासाच्या कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी अजित पवार यांनी दिली. पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्रात नवा काळ सुरू झाला आहे. आदित्य ठाकरे खूप चांगले काम करत आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम पुढच्या पाच-दहा वर्षांनंतर दिसतील. त्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे, असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -