घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रही धडपड नेमकी कशासाठी ? फक्त एका फोटोसाठी..

ही धडपड नेमकी कशासाठी ? फक्त एका फोटोसाठी..

Subscribe

दिलीप गिते ।  नाशिक

तिबोटी खंड्या नावाचा एक सुंदर पक्षी जंगलात दृष्टीस पडतो. जुलै-ऑगस्ट हा त्याचा विणीचा काळ असतो. नेस्टमध्ये अंडी घालून तो पिलांना जन्म देतो. नंतर पिलांसाठी विविध प्रकारचे भक्ष्य घेऊन येतो व पिलांना खाऊ घालतो. तिबोटी खंड्याचे फोटो काढण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. त्याला विचलित न करता हे पाहणे अतिशय आनंददायी अनुभव असतो. कर्नाळा, पनवेल, चिपळूण, कोकण परिसरात फोटोग्राफीसाठी छंद जपलेले फोटोग्राफर बराच लांबचा प्रवास करत असतात. एवढे करूनही जास्त पाऊस असल्यास सर्व कष्टावर पाणी फेरले जाते. आम्ही तिघांनी अलिकडेच या पक्षीदर्शनासाठी कोकण दौरा केला. त्यावेळचा हा किस्सा..

- Advertisement -

किरण बेलेकर, मेहुल थोरात आणि मी अर्थात दिलीप गिते असे आम्ही तिघांनी या सुंदर पक्षाचे फोटो काढण्यासाठी कोकणात जायचा प्लॅन केला. चिपळूणजवळील तोंडली या निसर्गरम्य वाडीत तिबोटी खंड्याने पिलांना फिडिंग चालू केल्याचे आम्हाला समजले होते. पाऊस, दरड यामुळे आम्ही कारऐवजी रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिकहून बुकिंग मिळाले नाही म्हणून ठाणे येथून कोकण कन्या एक्सप्रेसचे तत्काळ कोट्यातून तिकीट काढले. ही रेल्वे ठाण्याहून निघण्याची वेळ रात्री ११.५० वाजेची होती. कॅमेरा, लेन्ससाठी एक बॅग व कापडाची दुसरी पिशवी अशा प्रत्येकी दोन बॅगा घेऊन आम्ही सायंकाळी सातला नाशिकहून कॅबने निघालो. रात्रीचे जेवण एखाद्या हॉटेलवर करायचे ठरले होते. त्यामुळे टिफीन सोबत घेतला नव्हता. रात्री ९ पर्यंत आम्ही आसनगावजवळ पोहोचलो. तेथून पुढे गुगल मॅपवर मोठी ट्रॅफिक जॅम दिसत होती. त्यातून बाहेर पडणे अवघड दिसत होते. गूगल मॅपवर एक पर्यायी रस्ता आसनगावजवळून दाखवत होता. तो अरुंद असला तरी ट्रॅफिक जॅम बायपास करू असे वाटत होते. म्हणून आम्ही त्या मार्गाने निघाले. सात किलोमीटर आल्यावर समजले की, या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे व त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी आमची अवस्था झाली होती. अर्धा तास एकाच ठिकाणी थांबूनही आमची कार एक इंचही पुढे जाऊ शकली नव्हती. जास्त वेळ थांबलो तर रेल्वे सापडणार नाही, असे वाटत होते. म्हणून आम्ही माघारी फिरून आसनगाववरून लोकलने ठाणे गाठायचा निर्णय घेतला. छोटा रस्ता व जोरदार पावसाचा सामना करत कसेबसे आसनगाव रेल्वेस्टेशनवर रात्री ११ वाजता पोहोचलो. शेवटची लोकल रात्री ११.०८ ला होती. पाच मिनिटांत लोकल आली. ठाण्याला पोहोचायला १२.२० झाले. बुकिंग केलेली कोकण कन्या आम्हाला टाटा करत आमच्या डोळ्यांसमोरून निघून गेली.

आत्ता काय करायचे असा यक्षप्रश्न होता. आमच्यातील एकाने परत घर परतू व नंतर कधीतरी प्लॅन करू असे सूचविले. तीन वर्षांपासून हा खंड्या आम्हाला हुलकावणी देत होता. त्यामुळे परत फिरायची अजिबात इच्छा नव्हती. काहीतरी मार्ग काढू असा विचार करत असतानाच तुतारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली. ही चिपळूणला जाते हे माहीत होते. आम्हाला जनरल बोगीत जागा मिळाली पण पण जेवण राहून गेले. सोबत घेतलेले बिस्कीट खाऊन पाणी पिऊन बसल्या बसल्या डुलकी लागली. पहाटे साडेचारला उठून ट्रेकसाठ उठलो होतो. दुपारी दीडला ट्रेक संपला. त्यामुळे थकवा जाणवत होता.भरपूर झोप येत होती पण पाठ टेकवायला जागाच मिळत नव्हती. सकाळी ६.३० वाजता जाग आली. खिडकीत बसून कोकणाचा आनंद घेत बसलो. अनेक बोगदे, उंच पूलांवरून गर्द झाडीमधून रेल्वे पुढे जात होती. सकाळी ८.३० वाजता आम्ही चिपळूणच्या पुढील सावर्डे स्टेशनला पोहोचलो. अशा प्रकारे रेल्वेच्या कृपेने आम्ही एकदाचे पोहोचलो.

- Advertisement -

आम्हाला घ्यायला कार उभी होती. कारमधून कोकणाचे निसर्गरम्य दृश्य दिसत होते. वळणावळणाचे रस्ते, कौलारू घरे, वाड्या, दाट जंगल असे सारेकाही कोकणाचे रहस्य सांगत होते. पाऊण तासात आम्ही तोंडली येथील व्हिसलिंग फार्म येथे पोहोचलो. रूमवर सामान ठेऊन, फ्रेश होऊन आम्ही लगेच तिबोटी खंड्या जेथे फीडिंग करतो त्या साईटवर जायला निघालो. रात्री जेवण केलेले नव्हते तरी त्या पक्षाला बघायची, फोटो काढण्याची उत्सुकता वाढली होती. १५-२० मिनिटांत आम्ही एका जंगलातून चालत पोहोचलो. थोड्याच वेळात आम्हाला बहुप्रतिक्षित तिबोटी खंड्याचे दर्शन झाले.
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी अतिशय सुंदर दिसत होता. किंग फिशर जातीतला हा पक्षी बघून व फोटो काढून थकवा पळून गेला होता. विविध रंगबिरंगी पंख असलेल्या या पक्षाला ज्वेल ऑफ कोकण असेही म्हणतात. तो पिलांना पाली, बेडूक, साप सुरळी, खेकडा असे वेगवेगळे भक्ष्य घेऊन येत होता. फार्म हाऊसचे मालक अजय सावंत घरून आमच्यासाठी पोहे घेऊन आले होते. फार न आवडणार्‍या पोह्यांवर येथेच्छ ताव मारला. सुदैवाने पाऊस उघडला होता, स्वच्छ प्रकाश होता. त्यामुळे मनासारखी फोटोग्राफी झाली होती.

या वाडीतील घरे अतिशय सुंदर जांभ्या दगडात बांधलेली आहे. जंगल तर खूप घनदाट आहे. खालून एक पाण्याचा प्रवाह वाहत होता. त्याचा झुळूझुळू आवाज बॅकग्राउंडला संगीत देत होता. येथे पशुपक्षी विपुल प्रमाणात आढळतात. परंतु, आमचे टार्गेट फक्त तिबोटी खंड्या होता. एकंदरीत खूप छान सफर झाली. रात्री जेवण करून दुसर्‍या दिवशी सकाळी परत फोटोग्राफीसाठी गेलो. दुपारी आम्ही तोंडली गावावरून चिपळूणला जाण्यासाठी प्रीपेड गाडी ठरवली. हे अंतर जवळपास ४० किलोमीटर आहे. नाशिकला परत येण्यासाठी आम्ही सातारा येथून स्लीपर कोच बसचे बुकिंग केले होते. मात्र, चिपळूणहून सातारा कसे जायचे, याची चौकशी केली असता रत्नगिरीवरून एक बस सातार्‍याला जाते असे समजले.
आम्ही त्याच मार्गाने जात होतो. एक बस रत्नागिरीहुन येत होती. तिला रस्त्यात हात दाखवून थांबवले. घाईघाईत दोन बॅगा घेऊन बसमध्ये चढलो. चिपळूणपासून केलेली गाडी आम्ही अर्ध्या रस्त्यावरून परत पाठवून दिली. कंडक्टरकडे सातार्‍याचे तिकीट मागितले तेव्हा त्यांनी ही बस सातार्‍याला जात नाही. तुम्ही चिपळूणला उतरा व तेथून सातार्‍यासाठी बस आहे का, याची चौकशी करा, असा सल्ला दिला. आता मात्र कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आमच्या वेडेपणाचे व फजितीचे हसूही येत होते.

चिपळूणचे तिकीट काढून बसने शेवटी चिपळूणला पोहोचलो. तेथून बस पकडून रात्री १० वाजता कराडला पोहोचलो. सातार्‍याला जाणार्‍या स्लीपर कोचमध्ये कराडला बसून तिसर्‍या दिवशी नाशिकला व्यवस्थित पोहोचलो. अशा गमती-जमतीत आमचा प्रवास झाला. यात थोडा त्रास झाला, पण या दौर्‍याचे चीज झाले. हा सारा खटाटोप कशासाठी? तर, एका पक्षाच्या फोटोसाठी, त्याला पाहण्यासाठी होता. यातून काय मिळते, असे अनेकजण विचारतात. त्यावर माझे उत्तर असते… मनस्वी आनंद… आपल्या तिजोरीत या पक्षाचा फोटोरुपी ठेवा असावा असे प्रत्येक छायाचित्रकाराला वाटत असते. हा अनुभव, फोटो दाखवताना मोठे समाधान मिळते. ही तिजोरी दुर्मिळ पक्षी, वन्यजीवांच्या फोटोने भरत जाते तसतसे आपण श्रीमंत होत जातो. या आनंदाची तुलना कोणत्याही वस्तू किंवा संपत्तीशी होऊ शकत नाही आणि अशी तुलना निदान सुखाच्या बाबतीत करणे केवळ अशक्य, असे मला वाटते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -