घरमहाराष्ट्रनव्हते मालदार तरी केले आमदार

नव्हते मालदार तरी केले आमदार

Subscribe

कोण म्हणतं राजकारणात पैसा लागतो?

आमदार किंवा राजकारणी म्हटल्यावर भरपूर सारी संपत्ती,जंगम मालमत्ता ,गळ्यात चैन,अंगठ्या अशी काहीशी प्रतिमा उभी राहते.त्यात निवडणूक लढवायची म्हटली की,भरपूर पैसा लागतो असा काहीसा आपला समज असतो.परंतु,2019च्या विधानसभा निवडणुकीत असे काही आमदार निवडून आले आहेत,ज्यांनी या सर्व समजांना खोडून काढले आहे. त्यापैकी पहिले म्हणजे डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विनोद भिवा निकोले. अनेक उमेदवार हे अब्जाधिश आणि कोट्यधीश असल्याचे समोर आले आले असले तरी मात्र, याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार विनोद भिवा निकोले हे अपवाद आहेत. आमदार विनोद निकोले सर्वांत कमी श्रीमंत असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर दिसून येत आहे.

विनोद निकोले यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:च्या मालकीचे घरही नसून त्यांच्याकडे ५१ हजार ८२ रुपयांची रोकड असल्याचे समोर आले आहे. निकोले यांच्यानंतर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्याकडे ९ लाख ७० हजार २३० वारस प्राप्त मालमत्ता मिळून ३४ लाख ६० हजार ३३३ इतकी आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर विजयी झालेल्या राम सातपुते यांचा कमी मालमत्ता असणार्‍या आमदारांमध्ये समावेश करता येईल. त्यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा सहा हजार मतांनी पराभव केला आहे. राम यांचे आई-वडील ऊसतोडी करत होते. आता सातपुते यांच्या राहत्या घराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. सातपुते यांच्या विजयानंतर त्यांच्या राहत्या घराचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सातपुते यांच्या उंचीहून कमी उंचीचे गावातील एक पत्रे टाकलेले, मातीने सारवलेल्या भिंती असणारे घर दिसत आहे. या घराच्या दारासमोरच सातपुते उभे असल्याचे फोटोत दिसते आहे.

माळशिरसमधील पुरंदावडे येथील भांबुर्डी गावातील चाहुरवस्तीमध्ये हे घर आहे. हे घरही सातपुते यांच्या मालकीचे नसून त्यांचे वडील विठ्ठल सातपुते यांच्या मालकीचे आहे. सातपुते यांनी उमेदवारी अर्जबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:च्या नावावर घर नसल्याचे म्हटले आहे. सातपुते यांची एकूण जंगम मालमत्ता ५ लाख २५ हजार ७६० रुपये असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तसेच आपल्यावर ७५ हजाराचे कर्ज असून आपल्या नावावर शेतजमीन अथवा कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राम सातपुते यांची घरची परिस्थिती बेताची होती. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे कष्टप्रद काम करुन मुलांना शिक्षण दिले. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे १९९० ते १९९५ पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. माध्यमिक शिक्षण खेड्यामध्ये घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राम सातपुते यांनी पुणे गाठले. त्यावेळीच त्यांचा विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. तेथूनच त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या चळवळीला सुरुवात केली. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून राम सातपुते यांना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले. राम सातपुते यांना मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -