घरताज्या घडामोडीदरड का कोसळते ? नेमके कारण वाचा

दरड का कोसळते ? नेमके कारण वाचा

Subscribe

मुंबईत १८ जुलैच्या पावसाने केलेल्या कहरामुळे निष्पाप अशा २५ नागरिकांचा दरड कोसळून जीव गेला. मुंबईतील अनेक स्थलांतरीत कुटुंबे ही शहरातील अनेक दरडीच्या दाढेखाली भागात नाईलाजाने राहतात. मुंबईतील अनेक असे झोपडी परिसर आहेत, जिथे आजही २२ हजारांहून कुटूंबे ही आश्रयासाठी आहेत. मुंबईतील कुर्ला कसाईवाडा, विक्रोळी पार्कसाईट, कांजूरमार्ग, पवई, भांडुप – खिंडीपाडा, गिलबर्ट हिल, घाटकोपर चिरागनगर, खंडोबा टेकडी या परिसरात मोठ्या प्रमाणात दरडीचे प्रमाण आहे. मुंबईत गेल्या २९ वर्षांमध्ये २९० नागरिकांचा दरडीखाली दबून मृत्यू झाला आहे.

डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात सर्रासपणे अनुभवायला मिळतात. दरड कोसळण्याच्या घटना या मुंबईतील टेकडी परिसर असो वा मोठ्या महामार्गावर किंवा घाट परिसर असो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा घटना घडलेल्या हमखास पहायला मिळतात. पण दरड कोसळणे ही काही तासात किंवा एका दिवसात कोसळणारी घटना नाही. दरड कोसळण्यामागे अनेक कारणे आहेत. ही अनेक कारणे जुळून आली की दरड कोसळण्याची घटना घडते. अर्थात यासाठी अनेक गोष्टी जुळून येतात. पण दरड कोसळण्यापासून रोखण्यासाठी भारतात मोठा अभ्यास झालेला नाही. तसेच या दरडी रोखण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळही या समस्येच्या अनुषंगाने विकसित झालेले नाही. त्यामुळेच दरडी कोसळण्यासारखी समस्या ही दुर्लक्षितच राहिली आहे.

- Advertisement -

भारतात मुळातच दरडींचा विषय हा शास्त्रोक्त पद्धतीने हाताळला जात नाही. यासाठीचे प्रसिद्ध झालेला अभ्यासही अतिशय तोकडा आहे. एखाद्या छोटाश्या घटनेवर आधारीत अभ्यासाचे प्रबंध इतक्या मर्यादित स्वरूपाचा अभ्यास भारतात झालेला आहे. पण त्याव्यतिरिक्त शास्त्रोक्त पद्धतीने मात्र या विषयासाठीचा अभ्यास किंवा धोरण आतापर्यंत तयार झालेले नाही. भारतात अनेक भागात दरडींची समस्या असली तरीही याबाबतचे शास्त्रीय पद्धतीने असे कोणतेही अभ्यास संदर्भासाठी नाहीत. भारताच्या तुलनेत स्विडन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यासारख्या ठिकाणी मात्र सुरक्षेला प्राधान्य देतानाच मोठ्या प्रमाणात अभ्यास आणि दरडींना रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. वर्ल्ड डिझास्टर अहवालानुसार दरडींच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १ डॉलर इतका खर्च उदाहरण म्हणून झाल्यास दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर मोजावे लागणारे ३० डॉलर वाचवता येतात.

भारतात मोठ्या प्रमाणावर विविध भागात दरडी पडण्याचे प्रकार घडतात. त्यामध्ये कोकण रेल्वे, पश्चिम घाट परिसर, उत्तर पूर्व भागामध्ये जम्मू, उत्तराखंड यासारख्या भागात समावेश आहे. पण सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढाकार घेण्यासाठी मात्र उदासिनता आहे. वैष्णोदेवी ट्रस्टने पहिल्यांदा या कामासाठीचा पुढाकार घेतला. त्यामुळेच सुरक्षिततेच्या क्षेत्रात काम करणा-यांचा आत्मविश्वास वाढला आहे. वैष्णोदेवीच्या ठिकाणी पहिल्यांदा दगडांच्या स्लोपच्या ठिकाणी जाळ्या लावण्याचे काम झाले. तर मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गावरही दरडी कोसळू नयेत म्हणून संरक्षक जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी दरडींना बॅरिअरही लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

दरडी का कोसळतात ?

एखाद्या खडकाळ किंवा डोंगराळ भागात जेव्हा दरड कोसळते तेव्हा अनेक कारणे ही दरड कोसळण्याच्या घटनेसाठी कारणीभूत असतात. त्यामध्ये मुख्य घटक कारणीभूत ठरतो तो पाऊस. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की अशा खडकातील किंवा डोंगराळ भागातील मुख्य खडकापासूनचे दगड सुटतात. पाण्यामुळे दगडाला भेगा पडून हे दगड सुटण्यासाठी अतिवृष्टी हेच मुख्य कारण असते. अतिवृष्टीने एखाद्या मोठ्या खडकाची एकसंघ राहण्याची क्षमता ही कमी होते. तेच कारण हे दरडीचा भाग मूळ खडकातून सुटण्याचे कारण ठरते. म्हणूनच भरपूर पाऊस वाढला की हमखास दरडी कोसळण्यासाठी सुरूवात होते. त्यासाठीच दरडी कोसळू नये म्हणून मोठ्या खडकाच्या किंवा डोंगराळ भागात पाण्याला वाट मोकळी करून देणे ही दरड रोखण्यासाठीची एक पद्धत आहे. पण अनेक ठिकाणी दरडींचे होत नाही ही मुंबईसह भारतातील अनेक भागांची स्थिती आहे. त्यामुळेच पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमुळे नाहक बळी जाण्याचे प्रकार हे गेल्या वर्षांमध्ये सातत्याने समोर आले आहेत.

दरडी रोखण्याच्या काय पद्धती आहेत ?

दरड कोसळण्यासाठी हमखास वापरली जाणारी पद्धत ती म्हणजे बोल्ट बसवणे किंवा जाळ्या बसवणे. पण या पद्धतीमध्ये कुशल असे कामगार हे देशात उपलब्ध नाहीत. म्हणूनच या कामासाठी परदेशातून कुशल कामगारांच्या मदतीने काम करून घेण्यात येते. दरडींच्या सुरक्षेचे काम करण्यामध्ये प्रामुख्याने नॉर्वे, स्विर्त्झलंड आणि स्विडन यासारख्या देशातही दरडींच्या सुरक्षेचे काम झाले आहे. त्याठिकाणी सुरक्षिततेला प्राधान्ये देतानाच मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. महत्वाचे म्हणजे या कामाचे दस्तावेजीकरणही झाले आहे.

स्पॅनिश टेक्निक काय ?

दरड कोसळू नये म्हणून बोल्ट बसवून दगड किंवा दरड मजबूत केली जाते. दगडाला कमी हादरे बसतील या पद्धतीने मशीनचा वापर करून दगडामध्ये बोल्ट मारले जातात. एका दगडाचे हादरे हे अर्ध्या मीटरच्या अंतरापेक्षा जास्त असणारी नाहीत याची काळजी घेतली जाते. कमकुवत झालेला दगड बोल्टच्या सहाय्याने मजबुत दगडाशी जोडला जातो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -