बंडखोर आमदार सरकारचा पाठिंबा काढणार?

सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निकालाने १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तूर्तास टळल्याने बंडखोर शिवसेना आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Eknath Shinde's new tweet after his name for the post of Chief Minister was announced

सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निकालाने १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई तूर्तास टळल्याने बंडखोर शिवसेना आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा कधीही काढला जाऊ शकतो. तसे पत्र बंडखोर आमदारांच्या गटाने दिले, तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणता निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात आता शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदार दाखल झाले आहेत. शिवसेनेकडे १६ आमदार शिल्लक राहिले आहेत. बंडखोर १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी केली होती. ही मागणी मान्य करीत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यांना सोमवारी सायंकाळपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती. त्यामुळे बंडखोर आमदारांवर कारवाईची शक्यता होती, पण सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत त्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे बंडखोर गटाला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, या गटाकडून आता सरकारचा पाठिंबा काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. या गटाकडून त्याबाबत लवकरच राज्यपालांना पत्र दिले जाऊ शकते, मात्र असे पत्र आल्यास राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगतील की सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीची वाट पाहतील याबाबत उत्सुकता आहे, मात्र अद्याप बंडखोर आमदारांकडून असे कोणतेही पत्र आले नसल्याची माहिती राजभवनच्या सूत्रांनी दिली.