घरमहाराष्ट्रशिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात...

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

Subscribe

कामं, विकासकामं करत राहणं गरजेचं आहे. त्या विषयांवर आपण फोकस केला तर देश खरोखरच पुढे जाऊ शकतो. जर कोणी अन्याय करत असेल, एवढं जोरजबरदस्तीनं अंगावर येत असेल तर त्यांच्याबरोबर मैत्री करू शकता का?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.

सिंधुदुर्गः जर कोणी अन्याय करत असेल, एवढ्या जोरजबरदस्तीनं अंगावर येत असेल तर त्यांच्याबरोबर मैत्री करू शकता का?, असं म्हणत भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पूर्णविराम दिलाय. आदित्य ठाकरे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते कुडाळ येथे बोलत होते.

गेल्या दोन अडीच वर्षात जशी वागणूक त्यांच्याकडून येत आहे. नुसते आम्ही नाही तर सगळ्याच राजकीय पक्षांना तशी वागणूक मिळत आहे. शिरोमणी अकाली दल असेल किंवा इतर काही राजकीय पक्ष असतील. मैत्री होणार, नाही होणार, करायची की नाही करायची हा खूप वेगळा विषय राहिलेला आहे, असंही आदित्य ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

वाढती महागाई लपवण्यासाठी हे विषय पुढे आणले जात आहेत का? तो एक प्रश्न आहे. बेरोजगारी वाढते ते लपवण्यासाठी इतर विषय पुढे आणले जात आहेत का? देशासमोर हे जे विषय आहेत, ते राजकारणापेक्षा फार मोठे विषय आहेत, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. कामं, विकासकामं करत राहणं गरजेचं आहे. त्या विषयांवर आपण फोकस केला तर देश खरोखरच पुढे जाऊ शकतो. जर कोणी अन्याय करत असेल, एवढं जोरजबरदस्तीनं अंगावर येत असेल तर त्यांच्याबरोबर मैत्री करू शकता का?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.

विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनी नाणारवरही भाष्य केलंय. नाणार हा रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये लोकवस्ती, गावं असल्यानं तो प्रकल्प तिथून हलवलेला आहे. चांगला प्रकल्प येत असल्यास स्थानिक लोक आणि भूमिपुत्रांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क त्यांना कसे मिळतील हे बघून त्यांचा विश्वास जमवून आम्हाला पुढे जायचं आहे. कुठेही कोणाच्या विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे मी आश्वासित करतो. मला वाटतं तिथे दोन्ही बाजूंचे शिष्टमंडळ मला भेटणार आहे. दोघांशीही चर्चा करेन आणि जी काही त्यांची मतं आणि मागण्या असतील त्या मुख्यमंत्र्यांसमोर नेईन. रिफायनरीच्या प्रस्तावांवर सखोल चर्चा होत आलीय. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला हानी होणार नाही. याची काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. नाणारसाठी जागा शोधायचा प्रयत्न सुरू आहे. जिथे वाड्या वस्त्या आणि गावं नसतील अशाच जागा शोधू, कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच जर तो प्रकल्प आला तर पुढे आम्ही मान्यता देऊ, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

कोविड कमी झाल्यानं सगळीकडेच फिरायला सुरुवात झालीय कारण सभा समारंभ वाढले आहेत. गर्दी वाढायला लागलेली आहे. कोविडच्या काळात भेटीगाठी व्हायच्या पण त्या थोड्या बंदिस्त असायच्या. कारण सगळेच लॉकडाऊनचे निर्बंध होते. कोविडची मीटिंग चालायची आणि तर सगळी कामं थोडी कमी होती. पायाभूत सुविधांची कामं थांबली नव्हती. सिंधुदुर्गात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे चिपी विमानतळ आणि मेडिकल कॉलेज सुरू केलेली आहेत. कोकणाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसं विकसित करता येईल, यावर आपण फोकस करायला लागलेलो आहोत, असंही ते म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकारने पर्यावरण, पर्यटन आणि कोकणावर विशेष लक्ष दिलेलं आहे. कारण या तीन गोष्टींकडे आधी कमी फोकस असायचा. कोकणात देखील सिंधुरत्न महोत्सव, चिपी विमानतळ, रत्नागिरीच्या विमानतळासाठी 100 कोटी दिलेले आहेत. सागरी महामार्ग आणि अंतर्गत रस्ते आपण करत आहोत. राजकीय गोष्टी या निवडणुकीच्या काळात होतात, पण जिथे जिथे आपण कामं करतो, त्या कामांवर लोक विश्वास दाखवतात, असं म्हणत त्यांनी निवडणुकीच्या सुंदोपसुंदीवर भाष्य केलंय.

तानाजी सावंतांनी केलेल्या वक्तव्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्ट केलंय. दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असतात, तिथे ही खदखद होते. जेव्हा नाराजीचे सूर दिसतात तेव्हा आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री हे तिघे तर आहेतच. पण जे इतर देखील नेते आहेत महाविकास आघाडीचे, ते बसून ही नाराजी दूर करतात. राजकारणात हे सगळं सुरूच राहतं. महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलोय आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तानाजी सावंत यांचं मत वैयक्तिक असेल. या आधीदेखील सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक मतदारसंघाला भेदभाव न करता न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते आपल्याला मान्य करूनच पुढे जावे लागेल. काही जणांना स्कीम आणायची असतात, त्यांची नाराजी असणं साहजिकच आहे. ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.

यशवंत जाधवांच्या मातोश्री प्रकरणाला त्यांनी अफवा असल्याचं म्हटलं. अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं. अधिकृत गोष्टी बाहेर येतीलच, अफवांवर मी काही बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.

राजकीय षडयंत्र चाललेलं आहे. जिथे भाजपचं सरकार नाही, तिथे या गोष्टी सुरू आहेत. न घाबरता या गोष्टींना सामोरं जावंच लागणार आहे. टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र असेल, जिथे जिथे यंत्रणा अशा मागे लागतायत, ते तोंडावर पडतायत. अफवा, बदनामीचे प्रकार, यंत्रणेचे प्रकार होतायत. ते कुठे ना कुठे तरी थांबले पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नव्हे. ही देशाचीसुद्धा संस्कृती नाहीये. विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स आतापर्यंत वाचलेला शब्द आहे तो आता बघायला मिळतोय. सरकार बनतं आणि सरकार पडतातही पण त्यानंतर जे नैराश्य येतं, यातून विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स केलं जातं, तो खूप एक धोकादायक प्रकार आहे, असंही त्यांनी सांगितलंय आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -