घरमहाराष्ट्रसीईटी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांना मिळणार गुण

सीईटी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांना मिळणार गुण

Subscribe

चुकीच्या प्रश्नासंदर्भात विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. एमएच सीईटी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडून ७९१ हरकती विद्यार्थ्यांनी नोंदवल्या होत्या. त्याची दखल घेत सीईटीने केलेल्या पडताळणीनंतर हा निर्णय घेतला आहे.

राज्य सामाईक परीक्षा सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या परीक्षांमध्ये झालेल्या तांत्रिक चुकांचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. ज्या शिफ्टमधील परीक्षांमध्ये चुकीचे प्रश्न, चुकीचे पर्याय असलेले प्रश्न विद्यार्थ्यांना आले होते. चुकीच्या प्रश्नासंदर्भात विद्यार्थ्यांना गुण देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. एमएच सीईटी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांकडून ७९१ हरकती विद्यार्थ्यांनी नोंदवल्या होत्या. त्याची दखल घेत सीईटीने केलेल्या पडताळणीनंतर हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सीईटी सेलने विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षा यशस्वीरित्या घेतल्या. त्यातील एमएचटी-सीईटीची परीक्षा १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीईटी सेलकडून घेण्यात आली होती. २०० केंद्रावर झालेल्या या परीक्षेला ३ लाख ८३ हजार ७३६ विद्यार्थी उपस्थित होते. परंतु प्रत्यक्षात या परीक्षेसाठी ५ लाख ४२ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. ही परीक्षा पीसीबी गटासाठी १६ शिफ्ट आणि पीसीएम गटासाठी १४ अशी ३२ शिप्टमध्ये ही परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीसंदर्भातील हरकती सीईटी सेलकडे नोंदवल्या होत्या. विद्यार्थ्यांकडून १८० प्रश्नांबाबत तब्बल ७९१ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. यातील ३३२ हरकती सीईटीकडून फेटाळून लावण्यात आल्या. त्यानंतर मुख्य पर्यवेक्षक आणि फिजिक्स, केमिस्ट्र, मॅथ्स आणि बायोलॉजीच्या पर्यवेक्षकांनी वैध हरकतींचा अभ्यास करून सादर केलेल्या अहवालात ६५ हरकती बरोबर असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये फिजिक्सच्या १३, केमिस्ट्रीच्या १२, मॅथ्सच्या ५ आणि बायोलॉजीच्या सर्वाधिक ३५ प्रश्नांमध्ये तांत्रिक चुका झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र त्यातील २३ प्रश्नांमध्ये चुकीची उत्तरे, चुकीचा प्रश्न, एकापेक्षा अधिक योग्य उत्तरे दिल्याचे आढळून आले. त्यामुळे या २३ प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे. मात्र हे गुण ज्या शिफ्टमधील परीक्षेत हा चुकीचा प्रश्न आला आहे. त्यातीलच विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात दिली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चुकीचे प्रश्न आले होते त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -