घरमुंबईमहापूरामुळे एसटीचे १०० कोटी बुडाले!

महापूरामुळे एसटीचे १०० कोटी बुडाले!

Subscribe

आत्तापर्यंत गेल्या १० दिवसात एसटीचा ५० कोटी रूपयाचा महसूल बुडाला आहे. पुढील काही दिवसात पूर ओसरल्यानंतरच नुकसानीचा प्रत्यक्ष आकडा स्पष्ट होऊ शकेल.

महाराष्ट्रात सर्वदूर मागील १० दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीचा थेट फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला देखील बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत असून आत्तापर्यंत गेल्या १० दिवसात ५० कोटी रूपयाचा महसूल बुडाला आहे.


हेही वाचा – कोल्हापूर-सांगलीनंतर खान्देशही अतिवृष्टीच्या छायेत


पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा प्रत्यक्ष आकडा कळेल

या परिस्थितीमध्ये अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यानंतरच या स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा नक्की आकडा समजू शकेल. मात्र सद्यस्थितीला ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. दररोज एसटीच्या १८ हजार बसेसच्या माध्यमातून ५५ लाख किलोमीटर इतका प्रवास होतो. त्यातून सरासरी २२ कोटी रुपये उत्पन्न मिळते. पण गेल्या १० दिवसापासून दररोज एसटीचे किमान १० लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या रद्द होत आहेत. साहजिकच त्यामुळे एसटीच्या ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ५० लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या १२ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. ही परिस्थिती सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये आहे. पुढील काही दिवसात पूर ओसरल्यानंतरच नुकसानीचा प्रत्यक्ष आकडा स्पष्ट होऊ शकेल.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचे दिवस भरून द्यावे

अतिवृष्टीमुळे गाड्या न सुटल्याने एसटीचा कोट्यवधीचे नुकसान झाले. मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे मागील १० दिवस कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणांवरील एसटी बसची वाहतूक काही प्रमाणात ठप्पच होती. परिणामी या मार्गावरील एसटीच्या चालक-वाहकांच्या हाती कामच नव्हते. असे असले तरी महापूराचा फटका या कर्मचाऱ्यांना बसू नये. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची गैरहजेरी न लावता, त्यांना दिवस भरून द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -