घरक्राइमधक्कादायक! दारूचा ग्लास सांडला म्हणून डोंबिवलीत एकाची हत्या!

धक्कादायक! दारूचा ग्लास सांडला म्हणून डोंबिवलीत एकाची हत्या!

Subscribe

ढाब्यावर झालेल्या वादातून एका तरुणाच्या अंगावर मोटार चढवून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पूर्व येथे घडला. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध हत्या आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली असून या सहा आरोपींची चौकशी सुरू आहे. शशांक महाजन (३८) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. विशेष म्हणजे मानपाडा पोलीस स्टेशनपासून जवळच हा प्रकार घडला आहे.

शशांक हा डोंबिवली पूर्वेतील टिळक नगर परिसरात राहणारा असून एका खासगी कंपनीत नोकरीला होता. रविवारी रात्री तो मित्र पिनाकीन कुलकर्णी याच्यासोबत मानपाडा पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या अमर लॉज या ठिकाणी असलेल्या एका ढाब्यावर जेवणासाठी गेला होता. दरम्यान, या ढाब्यावर दुसऱ्या टेबलवर मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांपैकी एका तरुणाला शशांक याचा धक्का लागल्यामुळे टेबलवर असलेला मद्याचा ग्लास पडला. यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला असता हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

- Advertisement -

दरम्यान, टेबलवर बसलेले तरुण ढाब्याच्या बाहेर येऊन शशांक याची बाहेर पडण्याची वाट पाहू लागले. शशांक आणि त्याचा मित्र पिनाकीन हे दोघे रात्री ढाब्याच्या बाहेर येऊन घरी जाण्यासाठी ओला टॅक्सीची वाट पहात काही अंतरावर चालत निघाले असता दोघांची वाट पहाणारा तरुण आणि त्याच्या इतर मित्रांनी शशांक आणि पिनाकीन याला वाटेत अडवून आमच्या गाववाल्यांना दादागिरी करतोय काय? असे बोलून शशांक आणि पिनाकीन या दोघांना मारहाण करून अल्टो या मोटारीत बसवले आणि मोटार थेट शशांक याच्या अंगावरून घेऊन पळून गेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शशांकला मित्र पिनाकीन आणि इतर लोकांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान शशांकचा मृत्यू झाला.

मानपाडा पोलिसांनी प्रथम अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून तसेच शशांकचा मित्र पिनाकीन याच्या तक्रारीवरून ६ जणांविरुद्ध हत्या आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहीत गुरव, सचिन पाटील, विनय लंका, निखिल सावंत, निनाद म्हात्रे आणि विक्रांत तांडेल या सहा जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली. अटक करण्यात आलेले आरोपी हे वेगवेगळ्या खासगी कंपनीत नोकरी करत असून त्यांना मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता ११ डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -