घरमुंबईक्या बात है! नायर रुग्णालयात ४०० बालकांना मिळालं मातेचं दूध

क्या बात है! नायर रुग्णालयात ४०० बालकांना मिळालं मातेचं दूध

Subscribe

गेल्यावर्षी नायर रुग्णालयात मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली होती. या मातृदुग्ध पेढीतून आतापर्यंत ४०० हून अधिक नवजात बाळांना मातेचं दूध मिळण्यास मदत झाली आहे.

मातेचं दूध हे अमृत मानलं जातं. पण, अनेक नवजात बाळांना वेगवेगळ्या कारणांमुळे मातेचं दूध मिळत नाही. त्यामुळे मुंबई पालिकेच्या शीव आणि केईएम रुग्णालयानंतर नायर रुग्णालयातही नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी नायर रुग्णालयात ही मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली होती. या मातृदुग्ध पेढीतून आतापर्यंत ४०० हून अधिक नवजात बाळांना मातेचं दूध मिळण्यास मदत झाली आहे. बाळाला जन्मानंतर अर्ध्या तासात आईचं दूध मिळणं गरजेचं असतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत बाळाला स्तनपान करणं आवश्यक असतं. आईच्या दूधातील पौष्टीक घटकांमुळे बाळाची योग्यरित्या वाढ होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. मात्र, अनेक माता काही कारणांमुळे बाळाला दूध देऊ शकत नाहीत. अशी नवजात बाळं आईच्या दूधापासून वंचित राहू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयात ‘मातृदुग्ध पेढी’ म्हणजेचं ‘ह्युमन मिल्क बँक’ सुरु केली गेली.

मातेचं दूध न मिळाल्याने बालकांचा मृत्यू

मातेचं दूध न मिळाल्याने जगभरात १३ लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबवण्यात येते. जगभरात ५१७ मातृदुग्ध पेढ्या आहेत तर भारतात १३ मातृदुग्ध पेढ्या आहेत. सर्वात आधी मुंबईतील शीव रुग्णालय, जे.जे.रुग्णालय, वाडिया, कामा, केईएम, राजीव गांधी आणि नायर रुग्णालयांमध्ये मिल्क बँक सुविधा उपलब्ध आहे. २०१८ मध्ये या ह्युमन मिल्क बँकेला सुरूवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ४०० नवजात बाळांना याचा फायदा झाला आहे. प्रि टर्म बेबी आणि जन्मापासूनच अशक्त असून एनआयसीयूमध्ये असणाऱ्या बाळांना या मिल्क बँकचा फायदा होतो. तर ६०० मातांनी आतापर्यंत दूध दान केलं आहे. त्यापैकी २३५ माता यांनी सतत दूध दान केलं आहे. त्यापैकी एका मातेने ५५ वेळा आतापर्यंत दूध दान केलं असून गेले ६३ दिवस त्या सतत दूध दान करत आहेत, असं बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक यांनी सांगितलं.

अनेकदा महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला दूध येत नाही. मातेला दुध येत नसल्यानं अशा बाळांसाठी मातृदुग्ध पेढी हा एकमेव पर्याय असतो. शिवाय, जी बाळं प्रसूती वेळेच्या आधी जन्माला येतात, त्यांना हे दान केलेलं दुध बाळाला पाजलं जातं. शिवाय ज्या बाळांना सोडून दिलं जातं अशा बाळांनाही दूध पाजलं जातं. दरदिवशी किमान १ लीटर दूध दान केलं जातं आणि ५ माता दूध दान करतात. त्यांनी केलेल्या दानाच्या बदल्यात त्यांना पैसे दिले जात नाहीत. त्यांना एक अंड , दूध आणि केळं हा आहार दिला जातो. ज्यामुळे त्या सुदृढ राहू शकतील.
– डॉ. सुषमा मलिक, बालरोग विभाग प्रमुख, नायर रुग्णालय
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -