Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पालिका रुग्णालयात ६८ पदांसाठी होणार भरती; 'या' तारखेला होणार मुलाखती

पालिका रुग्णालयात ६८ पदांसाठी होणार भरती; ‘या’ तारखेला होणार मुलाखती

पालिका रुग्णालयात ‘वॉक ईन इंटरव्ह्यू’ द्वारे होणार ६८ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, कर्मचारी यांची काहीशी कमतरता भासत आहे. त्यामुळे पालिकेने, वांद्रे (प.) परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालय, कुर्ला परिसरातील खान बहादूर भाभा रुग्णालय, सांताक्रुझ परिसरातील विष्णूप्रसाद नंदराय देसाई रुग्णालय, कांदिवली (प.) परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालय, गोवंडी (पूर्व) परिसरातील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर (पूर्व) परिसरातील सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा रुग्णालय (राजावाडी रुग्णालय) या ६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये अधिक प्रभावी वैद्यकीय सेवा-सुविधा देता याव्यात, यादृष्टीने डॉक्टरांची ६८ पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे.

डॉक्टरांची ६८ पदे

या पदांसाठी येत्या शुक्रवारी व शनिवारी ‘वॉक ईन इंटरव्ह्यू’चे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींद्वारे वरिष्ठ सल्लागार स्तरावरील ३२ पदे, तर कनिष्ठ सल्लागार स्तरावरील ३६ पदे; अशी एकूण ६८ पदे भरली जाणार आहेत.

- Advertisement -

यामध्ये भेषज्य (Medicine), शल्यचिकित्सा (Surgery), स्त्रीरोग तज्ज्ञ (Obst. & Gyn.), बालरोग तज्ज्ञ (Pediatrics), अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedics), भूल तज्ज्ञ (Anaesthesia), विकिरण तज्ज्ञ (Radiology), कान-नाक-घसा तज्ज्ञ (E.N.T.), नेत्र तज्ज्ञ (Ophthalmology), रोगनिदान तज्ज्ञ (Pathology) इत्यादी वैद्यकीय विद्या शाखांशी संबंधित विविध ६८ पदांचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्जदाराकडे एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी शैक्षणिक पात्रता असण्यासोबतच किमान ५ वर्षांचा कार्यानुभव असणे गरजेचे आहे. वरिष्ठ सल्लागार पदासाठीची शैक्षणिक पात्रता देखील एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी असून कार्यानुभव मात्र ८ वर्षांचा असणे गरजेचे आहे.

दीड ते दोन लाख रुपये मानधन

- Advertisement -

तसेच वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणा-या व्यक्तिने किमान ३ संशोधन विषयक कामे केलेली असावीत, तर कनिष्ठ सल्लागार पदासाठी किमान २ संशोधन विषयक कामे आवश्यक आहेत. तसेच अर्जदाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. निवड होणा-या वरिष्ठ सल्लागारांना दरमहा रुपये २ लाख, तर कनिष्ठ सल्लागारांना दरमहा रुपये १ लाख ५० हजार इतके ढोबळ मानधन असेल.

आवश्यक कागदपत्रे

‘वॉक ईन इंटरव्ह्यू’साठी येताना अर्जदाराने शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची गुणपत्रिका, वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, नाव बदलले असल्यास संबंधित कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात. अर्जदाराने साध्या कागदावर संबंधित सर्व तपशील नमूद करुन व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत जोडून अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी आवेदन शुल्क रुपये २ हजार इतके असणार आहे. तसेच अर्जदाराने मुलाखतीसाठी स्व-खर्चाने उपस्थित राहावयाचे आहे.

 

- Advertisement -