घरमुंबईमूत्रपिंड दान करुन सत्तर वर्षीय आईने वाचवला मुलाचा जीव

मूत्रपिंड दान करुन सत्तर वर्षीय आईने वाचवला मुलाचा जीव

Subscribe

पॉलिसिस्टिक या मुत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त रुग्णाला मिळाले नवे जीवन

मूत्रपिंड जादा मोठे (एन्लार्ज) होण्याच्या विकाराने ग्रासलेल्या आपल्या ४५ वर्षाच्या मुलाला ७० वर्षीय आईने मूत्रपिंड दान केले आहे. उत्तर प्रदेशातील ४५ वर्षीय जुनैद (बदलेलेलं नाव) हे पॉलिसिस्टिक किडनी विकाराने त्रस्त होता. त्यांच्या ७० वर्षीय आई फातीमा यांनी मूत्रपिंड दान करत जीवदान दिलं आहे. मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये त्याच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जुनैदचा हा प्रदीर्घ प्रवास होता, तो पॉलीसिस्टिक मूत्रपिंड विकारावर उपचार मिळवण्यासाठी थेट उत्तर प्रदेशातून मुंबईत दाखल झाला होता. त्याच्या मूत्रपिंडांचा आकार वाढून २४ सेंमी झाला होता. सामान्यतः हा आकार ९ ते १० सेंमी असतो. यामुळे त्याची कार्यक्षमता कमी झाली होती आणि शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरला नव्हता. दिवसेंदिवस वाढत चाललेली गुंतागुंत पाहता, सर्जन्सना शस्त्रक्रिया करून दोन्ही मूत्रपिंडे काढावी लागली. ही केस डॉक्टरांसाठी खूप मोठं आव्हान होती. रुग्णाला संपूर्ण हेमोडायलिसिसवर ठेवण्यात आलं होतं. त्याची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी त्याला ६ वेगवेगळी औषधे घ्यावी लागत होती. जुनैदला खूप वेदना होत होत्या आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. केवळ किडनी ट्रान्सप्लांटनेच त्याचा जीव वाचू शकला असता. आपल्या मुलाची स्थिती पाहून फातीमाने आपली किडनी ट्रान्सप्लांटसाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तिचं वय पाहता ती किडनी दान करण्यास पात्र आहे की नाही हे तपासण्यासाठी विविध चाचण्या करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट सामान्य असल्याचं आढळल्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वी झाली.

“पॉलीसिस्टिक किडनी विकार हा एक आनुवांशिक विकार आहे, ज्यात मूत्रपिंडात गाठी तयार होतात. या गाठींमुळे मूत्रपिंड फुगते. जुनैदचे क्रिएटिनिन ९ पर्यंत गेले होते. फक्त किडनी ट्रान्सप्लांटमुळेच त्याचा जीव वाचू शकत होता. जेव्हा जुनैदची आई एक दाता म्हणून पुढे आली, तेव्हा तिच्या वयाचा विचार करून आम्हाला थोडी काळजी वाटली होती. पण आपल्या मुलाला जीवदान देण्याची तिची इच्छाशक्ती दांडगी होती.”- डॉ. अनुप चौधरी, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

- Advertisement -

या शस्त्रक्रियेनंतर आई आणि मुलगा या दोघांची प्रकृती ठीक आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, असं नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉ. हरीश पाठक यांनी सांगितलं.

अवयवदानासाठी पुढाकाराची गरज
भारतात दरवर्षी पाच हजारांपेक्षा कमी मूत्रपिंड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केल्या जातात. अंदाजे १ लाख ७५ हजारपेक्षा अधिक लोकांना मूत्रपिंडाची आवश्यकता असते. अवयवदानामुळे बऱ्याच रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, भारतात मृतांच्या अंगदानाचा दर एक दशलक्ष लोकवस्तीमध्ये अंदाजे ०.५८ टक्के आहे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -