घरमुंबईगाळ काढण्यासाठी साडेचार कोटींचे नवे टेंडर

गाळ काढण्यासाठी साडेचार कोटींचे नवे टेंडर

Subscribe

मांडवा येथे 20 कोटी गाळात!

जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवेला येत्या दीड महिन्यात सुरुवात होणार असल्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी मांडवा येथे पुन्हा एकदा गाळ काढण्यासाठी साडेचार कोटींची टेंडर नोटीस महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने (एमएमबी) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आतापर्यंतचे खर्च झालेले २० कोटी रुपये ‘गाळा’त गेले काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

एमएमबीने गाळ उपसण्यासाठी प्रथम 2017-18 मध्ये 16 कोटींचे टेंडर काढले होते. त्यानंतर 2018-19 साठी साडेचार कोटींचे टेंडर निघाले. आता 2019-20 मध्ये पुन्हा साडेचार कोटींचे टेंडर निघाले आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत साडेवीस कोटींचा खर्च झाल्यानंतर रो-रो सेवा सुरू होणे अपेक्षित असताना ती का सुरू झाली नाही, याबद्दल अलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुळात गाळ काढणार्‍या जहाजांची नोंद मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारितील व्हिसल्स ट्रकिंग सिस्टिमकडे असावी लागते. ती नसल्याने राज्य शासनाच्या गृह विभागाकडे तक्रार करून या गाळ प्रकरणाचा सावंत यांनी पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

16 कोटींच्या गाळ उपसण्याच्या सावंत यांच्या तक्रारीनंतर कंत्राटदाराला नोटीस बजाविण्यात येऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या कंत्राटदाराचे उर्वरित देयक थांबविण्यात आले होते. असे असताना एमएमबीने पुन्हा साडेचार कोटी रुपयांच्या नव्या टेंडरचा घाट घातला आहे. रो-रो सेवा सुरू करण्यास बोर्ड कटिबद्ध असले तरी दरवर्षी निव्वळ गाळ उपसण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च होणार असतील तर त्या खर्चात रेवस-करंजा पूल बांधण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि सिडको या तीन यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेंतर्गत सागरी वाहतुकीस वाव मिळण्यासाठी 32 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बंदरांवर पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात आलेल्या आहेत.

रो-रो सेवेतून एका फेरीत 300 प्रवासी आणि 40 वाहने नेण्याची क्षमता जहाजात असणार आहे. यामुळे मुंबई ते अलिबाग हा अडीच तासांचा रस्ता प्रवास 45 मिनिटांवर येणार आहे. सध्या भाऊचा धक्का ते मांडवा अशी फेरीबोट सुरू आहे. त्यातून पाऊण तासात मांडव्याला पोहोचता येते. या प्रवासासाठी 190 रुपये एवढा दर आकारला जातो. रोपॅक्स (मालवाहतूक किंवा रो-रो) सेवेमुळे मुंबई आणि अलिबाग, तसेच रायगड जिल्ह्यातील उर्वरित गावे आणि रहिवाशांचा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -