आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या घरी छापा

साडेतीन कोटी रुपयांची सापडली कॅश

घराच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नथू विठ्ठल राठोड यांच्या राहत्या घरी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना सुमारे साडेतीन कोटी रुपयांची कॅश सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. ही कॅश गैरमार्गाने कमविण्यात आल्याचे उघडकीस आल्यास त्यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्यांची नोंद होणार आहे. या कारवाईमुळे नथू राठोड यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

गोरेगाव येथील आरे कॉलनीतील युनिट 32 मध्ये राहणार्‍या तक्रारदारांनी त्यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी आरे दुग्ध वसाहत कार्यालयात एक अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्यासाठी त्यांचे शिपाई अरविंद त्रिभुवन तिवारी यांनी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या वतीने मागण्यात आली होती, त्यामुळे त्यांनी ही लाच देण्याची तयारी दर्शवून या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर या दोघांनाही सोमवारी लाचेची 50 हजार रुपयांची रक्कम घेताना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते.

या कारवाईनंतर नथू राठोड यांच्या घरी या पथकाने अचानक छापा टाकला होता. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत पोलिसांनी 3 कोटी 46 लाख 10 हजार रुपयांची बेहिशोबी कॅश जप्त केली आहे. नथू राठोड यांनी त्यांच्या कामाच्या कारकिर्दीत ही बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे का, याचा आता तपास सुरू आहे. या तपासात ही बाब उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध अन्य एका गुन्ह्याची नोंद होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.