घरमुंबई'मुलांचे अवयव काढून मृतदेह पुरले', आरोपींकडून पोलिसांचे 'एप्रिल फुल'

‘मुलांचे अवयव काढून मृतदेह पुरले’, आरोपींकडून पोलिसांचे ‘एप्रिल फुल’

Subscribe

‘आम्ही आठ मुलाचे अपहरण करून त्यांचे अवयव काढून त्यांचे मृतदेह जमिनीत पुरले, अशी धक्कादायक माहिती अपहरणकर्त्यांनी पोलिसांना दिल्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. अपहरणकर्त्यांच्या या माहितीमुळे शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दिवसभर अपहरणकर्त्यांनी दाखवलेला संपूर्ण परिसर जेसीबीच्या साहाय्याने खोदून काढला. मात्र पोलिसांना त्या ठिकाणी काहीही आढळून आलेले नाही. अपहरणकर्त्यांनी पोलिसांचा ‘एप्रिल फुल’ केल्याची चर्चा परिसरात सुरु होती. मात्र तपासात सहकार्य न करता पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अपहरणकर्त्यांनी केला असल्याचे डायघर पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

मुंब्रा शीळडायघर परिसरातून ३१ मार्च रोजी २ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या अपहरणाचा डायघर पोलिसांनी २४ तासांत छडा लावून अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका करून ३ महिलांसह ५ अपहरणकर्त्यांना अटक केली होती. या टोळीने मुंब्रा शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक लहान मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री राज्याच्या बाहेर केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. आफ्रिन मुन्ना खान (२०), मुबिना फिरोज शहा (४०), अमिरा दिवेकर (४६), अजीज इब्राहिम दिवेकर (४९) आणि मोहम्मद अझरुद्दीन उर्फ हसरूंद्दीन उर्फ अब्दुल अजीज शमशाद खान असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून पाचही अपहरणकर्ते मुंब्रा, शीळ डायघर आणि ठाकूरपाडा येथे राहणारे आहेत. डायघर पोलिसांनी अटकेत असलेल्या अपहरणकर्त्यांची चौकशी केली असता त्यांनी दिलेली माहिती ऐकून पोलिसांना धक्काच बसला.

- Advertisement -

‘आम्ही आतापर्यंत आठ मुलांचे अपहरण करून त्यांचे अवयव काढून अवयवायाची विक्री केली आहे. त्यानंतर मुलांचे मृतदेह शिळ महापे रोडवरील सहारा कॉम्पलेक्सला लागून असलेल्या डोंगराळ भागात जमिनीत पुरले असल्याची धक्कादायक माहिती अपहरणकर्त्यांनी दिल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ अपहरणकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून मंगळवारी सहारा कॉम्प्लेक्सला लागून असलेल्या डोंगराळ भागात जेसीबी मशीनच्या मदतीने दिवसभर खोदकाम केले. मात्र पोलिसांना त्या ठिकाणी काहीहि संशयित आढळून आले नाही. मात्र अपहरणकर्त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली असली तरी आरोपींनी पोलिसांचा एप्रिल फुल केल्याची चर्चा परिसरात दिवसभर रंगली होती.

दरम्यान पोलिसांना याबाबत विचारले असता आरोपींनी जरी आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असला तरी अपहरणकर्ते पोलिसांकडून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात कुठेतरी पाणी मूर्त असून त्या अनुषंगाने तपास सुरु असून लवकरच या गुन्हयात मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -