घरमुंबईसमलैंगिक पुरुषांमध्ये ‘एड्स’चे वाढते प्रमाण 

समलैंगिक पुरुषांमध्ये ‘एड्स’चे वाढते प्रमाण 

Subscribe

‘एड्स’बद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. पण, आजही जगात एड्स होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. शिवाय, एलजीबीटीक्यू (समलैंगिक महिला, समलैंगिक पुरूष, बायोसेक्सशुअल आणि ट्रान्सजेंडर) वर्तुळात आजही एड्स होण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याचे समोर आले आहे.

‘एड्स’बद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. पण, आजही जगात एड्स होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. शिवाय, एलजीबीटीक्यू (समलैंगिक महिला, समलैंगिक पुरूष, बायोसेक्सशुअल आणि ट्रान्सजेंडर) वर्तुळात आजही एड्स होण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याचे समोर आले आहे. यातील समलैंगिक पुरुषांमध्ये एचआयव्ही होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. समलैंगिक पुरुष गुदद्वाराच्या मार्गे शारीरिक संबंध ठेवतात. ते निरोध वापरतीलच, असे नाही. त्यामुळे यांची एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जास्त असते. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून मिळालेल्या गेल्या ३ वर्षांच्या आकडेवारीनुसार, सन २०१५-१६ मध्ये ११ हजार ७०८ समलैंगिक पुरुषांची नोंद करण्यात आली. ज्यातील ४६ जणांना एचआयव्ही झाल्याचे समोर आले आहे. २०१६-१७ या वर्षात ११ हजार ८९२ समलैंगिक पुरुषांची नोंद करण्यात आली. ज्यातील ७३ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण १२ हजार ६२० समलैंगिक पुरुषांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील १५६ समलैंगिक पुरुष एड्सवरील उपचार घेत आहेत.

समलैंगिकांमध्ये दोन प्रकार

१ – काही तरुणांना वयाच्या १५ ते २० वर्षांतच कळते की त्यांना समलैंगिक तरुण आवडतात. पण, कुटुंबीय, समाज स्वीकारेल का? या भितीने ते मनात सुरू असलेली घालमेल कोणालाच सांगत नाहीत. तसेच मन मारून आयुष्य जगतात.
२ – दुसरा गट असा आहे ज्यात समलैंगिक पुरुष सामाजिक दबावामुळे विवाह करतात. त्यातून त्यांना मुलेदेखील होतात. पण, एका क्षणानंतर त्यांच्या मनात चलबिचल सुरू होते आणि ते समलैंगिक पुरुषांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करतात. यातूनच अनेकदा असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले जातात आणि अशा पुरुषांना एचआयव्हीची लागण होते. यात अनेकांचे संसारही मोडतात. पण अशा विवंचनेत सापडलेल्या लोकांसाठी ‘हमसफर ट्रस्ट’महत्त्वाची भूमिका बजावते.

- Advertisement -

‘हमसफर ट्रस्ट’ची भूमिका

’हमसफर’ ट्रस्टमध्ये एलजीबीटी वर्तुळातील सर्व महिला आणि पुरुषांचा समावेश केला जातो. ही ट्रस्ट या समाजाला रोजगारापासून सर्व मदत उपलब्ध करून देते. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून या लोकांसाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. नव्याने दाखल होणार्‍यांचे समुपदेशन केले जाते. तपासण्या केल्या जातात आणि एखादा व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर त्याला मानसिक आधारापासून एचआयव्ही सोबत कसे जगायचे? याचे प्रशिक्षण दिले जाते.

‘समलैंगिक पुरुष किंवा ट्रान्सजेंडर यांच्यात जे शारीरिक संबंध येतात ते अत्यंत जोखमीचे असतात. त्यामुळे या लोकांमध्ये हे प्रमाण कमी व्हावे, यासाठीच मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी आणि हमसफर ट्रस्ट जनजागृतीचे काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत आता हे प्रमाण तुलनेत कमी झाले आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी बघितली तर आता हजारांमधील ५ ते ६ जण वर्षाला एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळतात,’असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisement -

ट्रान्सजेंडरमध्येही वाढते प्रमाण

२०१५-१६ या वर्षात ४ हजार ५२७ ट्रान्सजेंडरची नोंद करण्यात आली. त्यातून २४ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. २०१६-१७ या वर्षात ३ हजार ५२८ ट्रान्सजेंडरची नोंद करण्यात आली. त्यातून २९ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. आतापर्यंत एकूण २,७१० ट्रान्सजेंडरची नोंद करण्यात आली आहे. त्यात ९४ ट्रान्सजेंडर्स एचआयव्ही पॉझिटिव्ह असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रान्सजेंडरमध्ये सेक्स वर्करचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सेक्स वर्कर्समध्येही एचआयव्हीचे प्रमाण जास्त आहे. शिक्षण कमी असल्यामुळे निरोध किंवा सुरक्षित सेक्स कसा करायचा याची माहिती नसल्याकारणाने या समाजात हा आकडा वाढताना दिसतो. ‘या दोन्ही गटांमध्ये पार्टनर भेटण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वारंवार होणार्‍या लैंगिक संबंधातून एचआयव्ही होण्याचे प्रमाण जास्त आहे. एमडॅक्सकडून आम्हाला निधी उपलब्ध करून दिला जातो. पण, महापालिकेकडून मदत केली जात नाही. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीला ‘नॅको’कडून पैसा दिला जातो. त्यामुळे महापालिकेकडून आणखी जनजागृती झाली पाहिजे. तेव्हा कुठेतरी हा आजार कमी करायला मदत होईल,’ असे हमसफर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक राव कवी यांनी सांगितले.

असा होतो एड्स

असुरक्षित लैंगिक संबंध, एचआयव्हीबाधित रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी वापरलेली सुई दुसर्‍या रुग्णांसाठी वापरल्याने, एचआयव्हीबाधित व्यक्तीचे रक्त दुसर्‍या रुग्णाला दिल्याने, एचआयव्हीग्रस्त गरोदर महिलेपासून तिच्या होणार्‍या बाळाला (नाळेमार्फत), स्तनपानाद्वारे आदी कारणांमुळे एचआयव्हीचा प्रसार होऊ शकतो.

 यामुळे एड्स होत नाही

एचआयव्हीचा विषाणू सहजरित्या शरीराबाहेर हवेत जास्त काळ जगू शकत नाही. एचआयव्ही बाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, चुंबन घेतल्याने, एकत्र बसल्याने, जेवल्याने, सोबत राहिल्याने, डास चावल्याने एचआयव्हीचा प्रसार होत नाही.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -