घरमुंबईडोंबिवलीत राज्यमंत्री विरूध्द खासदारांचा गरबा रंगणार !

डोंबिवलीत राज्यमंत्री विरूध्द खासदारांचा गरबा रंगणार !

Subscribe

दांडियाच्या तालावर सेना-भाजपचे शह काटशहाचे राजकारण

डोंबिवली: अवघ्या दोन दिवसांवर नवरात्रीचा उत्सव आला आहे. डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा दरवर्षीप्रमाणे यंदाही गरबा दांडिया रंगणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने नवरात्र उत्सवासाठी शिवसेना व भाजपने चांगलीच तयारी केली आहे. यंदा दांडियात शिवसेना-भाजपचे नेते मंडळी हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे दांडियाच्या तालावर शिवसेना-भाजपमध्ये शह काटशहाचे राजकारण रंगणार असून दोन्ही गरब्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोंबिवलीतील डीएनसी मैदानावर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने नवरात्रोत्सवा निमित्त ‘रासरंग २०१८’ हा गरबा महोत्सव भरविला जातो. त्याला प्रत्युत्तर म्हणून डोंबिवली क्रीडासंकूल मैदानावर भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा ‘नमो गरबा’ भरविला जातो. सत्ताधारी शिवसेना व भाजप या मित्रपक्षांतील हे शह काटशहाचे राजकारण नेहमीच पाहावयास मिळते. यंदा रवींद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा गरबा अशी जाहिरात करून, नमो गरब्याचे शहरभर बॅनर आणि कमानी उभारल्या आहेत.

- Advertisement -

निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर राज्यमंत्री आण रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीत ठाण मांडून बसले आहेत. मागील वर्षी खासदारांच्या गरब्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे खासदारांचा गरबा चांगलाच फार्मात आला होता. तर चव्हाण यांच्या गरब्यात चक्क शिवसेनेचे स्थाानिक नेते रमेश म्हात्रे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. खासदार आणि राज्यमंत्री या दोन्ही दांडियामध्ये डोंबिवलीकरांची तुफान गर्दी होते. यंदा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने आपल्याकडे गर्दी वळविण्यासाठी शिवसेना व भाजप दोघांनीही चांगलीच कंबर कसली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. खासदार आनंद परांजपे यांनी शिवसेनेला सेाडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राजकारणात नवखे असलेल्या श्रीकात शिंदे यांना कल्याण लेाकसभेच्या रिंगणात उतरवले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी श्रीकांत शिंदे विरूध्द आनंद परांजपे ही लढाई ठाणे जिल्ह्यात गाजली होती. शिंदे हे खासदार म्हणून निवडून आले. मागील वेळेस शिवसेना-भाजपची युती झाली होती. त्यामुळे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिंदे यांच्यासाठी झपाटल्यागत काम केले होते. त्यामुळे शिंदे यांच्या विजयात त्यांच्या वडिलांइतकाच चव्हाण यांचाही हात आहे.

- Advertisement -

विधानसभेत युती तुटल्याने शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे लढले. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने रवींद्र चव्हाण पुन्हा आमदार झाले. पण त्यावेळी चव्हाणांच्या मदतीची जाण शिंदे कुटूंबिंयानी ठेवल्याचे बोलले गेले. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप पुन्हा आमने सामने आले होते. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती होईल की नाही याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. युती न झाल्यास कल्याण लोकसभेतून भाजपला उमेदवार उभा करावा लागणार आहे. कल्याण लोकसभेकडे भाजपचाही डोळा आहे. येत्या काही काळात हे स्पष्ट होईल. मात्र दांडियाच्या माध्यमातून शिवसेना-भाजपमध्ये शह काटशहाचे राजकारण रंगणार एवढे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -