घरमुंबईठाण्यात 'टोल मुक्ती' नक्की केली कुणी?

ठाण्यात ‘टोल मुक्ती’ नक्की केली कुणी?

Subscribe

ठाणेकरांना आम्हीच 'टोलमुक्ती' मिळवून दिली, असं म्हणत ठाण्यात सर्वपक्षीय नेते श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

वाहतूक कोंडी आणि टोल वसुलीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी एमएसआरडीसीने महिना भरासाठी टोलमुक्ती जाहीर केली. मात्र, या टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. टोलमुक्ती अमलात आल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचे काम सुरू झाले आहे. टोलनाका परिसरात ठिकठिकाणी फलक लावून आपल्या पक्षाच्या कामगिरीमुळे टोलमुक्ती झाल्याची बॅनरबाजी सर्वपक्षीय नेते करीत आहेत. तर पक्ष कार्यकर्ते ‘आमच्याच पक्षामुळे कशी टोलमुक्ती मिळाली’ हे ठाणेकरांच्या माथी मारत आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये टोलमुक्तीचे श्रेय लाटण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु झाली आहे. रस्त्यावरील  खड्डे आणि  मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कामामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बायपास दुरुस्तीमुळे अवजड वाहने शहरामधील रस्त्यावरून सोडण्यात येत आहेत. त्यामुळे टोलनाक्यावर लागणाऱ्या प्रचंड रांगा, त्याचा छोट्या वाहनधारकांना होणारा प्रचंड त्रास ठाणेकरांची डोकेदुखी झाली होती.

या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वाहनांना ऐरोली किंवा मुलुंड पैकी एकच टोल भरण्याचा दिलासा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, टोल कंपन्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पालकमंत्र्यांनी पिवळ्या पट्ट्याचा नियम करून पाहिला. मात्र सद्यस्थितीत तो पिवळा पट्टाही नाममात्र झाला आहे. अखेर यावर तोडगा म्हणून लहान वाहनांना ऐरोली आणि मुलुंड पूर्व आणि पश्चिमचे टोल महिन्याभरासाठी टोलमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यासह मुंबई आणि नवीमुंबईतील वाहनधारकांना महिन्याभरासाठी का होईना टोलमधून दिलासा मिळाला आहे. मात्र वाहतुक कोंडीपासून अद्यापही सूटका झाली नसल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी पार केल्यावरच नागरिकांना टोल नाका ओलांडता येतो. त्यातच टोलनाक्यासमोरच असलेल्या  खड्ड्यातून वाचवत वाहने चालवण्याचे दिव्य वाहनचालकांना करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. तरीही प्रत्येक पक्ष टोलमुक्तीच्या श्रेयासाठी पोस्टरबाजी करत असल्याने वाहनचालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर ‘किमान गणेशोत्सवापर्यंत मुलुंड आणि ऐरोली या टोल नाक्यावरील टोल वसुली स्थगित करून ठाणेकर प्रवाशांसाठी  टोल स्वातंत्र्य द्यावे’, अशी विनंती ठाण्याचे राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयावर चर्चा केली. या चर्चेनंतर गणपती उत्सव होईपर्यंत  टोल नाक्यांवर सर्व हलक्या वाहनास टोल माफी जाहीर केली आहे, असा भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.’

मुंब्रा बायपासची दुरुस्ती सुरू असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर आणि विशेषत टोल नाक्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून मुलुंडचे दोन्ही टोल नाके आणि ऐरोली अशा तीन टोल नाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल वसुलीला एक महिना स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी माननिय पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला असे सांगत, सारे श्रेय आमचेच’ असे शिवसेनेचे कार्यकर्ते सांगत आहेत.’

- Advertisement -

वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्यात यावी, यासाठी मुलुंड टोलनाक्यावर सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला होता. या आंदोलनाचा धसका घेतलेल्या एमएसआरडीसीने तत्काळ पावले उचलली. ऐरोली किंवा मुलुंड या पैकी एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची सूट वाहनचालकांना दिला आहे. शनिवारी पत्राद्वारे दिलेल्या इशाऱयामुळे रविवारपासून एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे.  टोलनाके बंद करावेत यासाठी  आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा टोल वसुली सुरुच ठेवण्यात आलेली असल्याने शनिवारी (दि.18) परांजपे यांनी एमएसआरडीसी आणि स्थानिक पोलिसांना पत्र देऊन सोमवारी उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर एमएसआरडीसीने तत्काळ सूत्रे हलवून एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची मुभा वाहनचालकांना दिली आहे’,  असा जोरदार प्रचार राष्ट्रवादी कडून केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -