रस्ते कामांसाठी आणखी १ हजार कोटींच्या निविदा

मुंबई महापालिकेने गेल्या २५ वर्षात रस्ते कामे, खड्डे बुजवणे आदींवर २१ हजार कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे पडतात, आरोप भाजपतर्फे करण्यात आला होता.

bmc

मुंबई महापालिकेने रस्ते कामांसाठी गेल्याच आठवड्यात १ हजार कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या होत्या. असे असताना आता पुन्हा एकदा रस्ते कामांबाबत आणखीन १ हजार कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत.

मुंबईतील रस्ते कामांसाठी कंत्राटदारांनी २६% ते ३०% कमी दरात निविदा भरत कामाची तयारी दर्शवली. मात्र त्यामुळे रस्ते कामे दर्जेदार होणार नाहीत, असा आक्षेप घेऊन भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादि पक्षांनी रस्ते कामांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने तब्बल १२०० कोटी रुपयांच्या निविदा मागे घेतल्या होत्या. मुंबई महापालिकेने गेल्या २५ वर्षात रस्ते कामे, खड्डे बुजवणे आदींवर २१ हजार कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांवर खड्डे पडतात, आरोप भाजपतर्फे करण्यात आला होता. त्यातच पालिकेने रस्त्यांची कामे करण्यासाठी १२०० कोटींच्या निविदा मागवल्या होत्या. मात्र त्यामध्ये कंत्राटदारांनी उणे ३०% पर्यंत रक्कम दर्शवल्याने भाजप व अन्य पक्षांनी कमी दरात रस्त्यांची कामे दर्जेदार होण्याबाबत शंका उपस्थित केली होती. त्यामुळे रस्ते कामांच्या या निविदा सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांना अडचणीच्या ठरल्या. परिणामी, पालिका प्रशासनाने सदर १२०० कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या निविदा मागे घेतल्या व गेल्या आठवड्यातच नव्याने १ हजार कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा मागवल्या होत्या.

आता पुन्हा एकदा आणखीन १ हजार कोटी रुपयांच्या रस्ते कामाच्या निविदा मागविण्यात आले आहेत. यातून, पालिका हद्दीत ७०० कोटी रुपयांची कामे तर म्हाडा वसाहतीतील ३०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने नव्याने मागविलेल्या १ हजार कोटींच्या निविदांमध्ये, परळ, वरळी, लोअर परळ, दादर, मुंबई सेंट्रल, दहिसर, बोरिवली, अंधेरी, कुर्ला आदी विभागातील कामांचा समावेश आहे.