कुर्ल्यात लैगिंक अत्याचारानंतर २० वर्षीय तरुणीची हत्या, प्रियकरासह मित्राला अटक

arrest of boyfriend and friend in Murder of 20-year-old girl after sexual assault in Kurla
कुर्ल्यात लैगिंक अत्याचारानंतर २० वर्षीय तरुणीची हत्या, प्रियकरासह मित्राला अटक

कुर्ला येथे लैगिंक अत्याचार करुन एका 20 वर्षांच्या तरुणीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीची ओळख पटली असून याच गुन्ह्यात तिच्या प्रियकरासह त्याच्या मित्राला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे. सतत लग्नासाठी दबाव आणत असल्याने रागाच्या भरात त्याने मित्राच्या मदतीने या तरुणीची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोघांविरुद्ध बलात्कार, हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून रविवारी दोघांनाही लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. साकिनाकानंतर कुर्ला परिसरात घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही गंभीर दखल घेतल आहे.

कुर्ला येथे एचडीआयएल नावाची एक इमारत प्रकल्पाग्रस्तासाठी बांधण्यात आली होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून ती बंद असून तिथे कोणीही राहत नाही. शुक्रवारी काही मुले तिथे इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनविण्यासाठी या इमारतीमध्ये गेले होते. यावेळी इमारत क्रमांक १६च्या लिफ्टजवळील एका रुममध्ये या तरुणांना एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार संशास्पद वाटताच त्यांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. या माहितीनंतर विनोबा भावेनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एका २० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह दिसून आला. तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा होत्या. तसेच तिच्या डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून आले. पंचनामा करुन तिचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर नंतर लैगिंक अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तिची मारेकर्‍याची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लिफ्टजवळील एका रुममध्ये ठेवल्याचा पोलिसांना संशय होता. या तरुणीची ओळख पटली नव्हती. तिची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. तपासादरम्यान या तरुणीची ओळख पटली. त्यांनतर काही तासात पोलिसांनी गोवंडी परिसरात राहणार्‍या रेहान आणि फैजान नावाच्या दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत मृत तरुणीचे रेहानसोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्याकडे सतत पैशांविषयी विचारणा करीत होती. मात्र रेहानला तिच्याशी विवाह करायचा नव्हता.

तिचा कायमचा काटा काढण्यासाठी त्याने तिला कुर्ला येथील एचडीआयएल इमारतीजवळ बोलाविले. 23 नोव्हेंबरला ती रेहानला भेटण्यासाठी तिथे आली होती. यावेळी रेहानसोबत त्याचा मित्र फैजान हादेखील तिथे आला होता. या दोघांनीच तिची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लिफ्टजवळील एका रुममध्ये ठेवून पलायन केले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. मृत तरुणी अठरा वर्षांची असून तिच्यावर या दोघांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केला आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा :  “तु्म्हाला हिशोब करायचा असल्यास कधीपण करु”, शिवेंद्रसिंह राजेंचं शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर