अर्थसंकल्प म्हणजे, रिकाम्या तिजोरीचा खडखडाट आणि कारभाऱ्यांचा बाजीराव थाट! – आशिष शेलार

bjp mla Ashish shelar slams on thackeray government after arnab goswami arrested

‘मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2021) म्हणजे, रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट आणि कारभाऱ्यांचा उगाचबाजीरावांचा थाट! फसलेला ताळमेळ आणि सगळा आकड्यांचा खेळ’ अशा शब्दांत भाजपचे आमदार आणि माजी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पालिकेच्या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेने यंदा तब्बल ३९ हजार ३८ कोटी रुपयांचं बजेट सादर केलं. गेल्या वर्षी अर्थसंकल्पाचा हाच आकडा ३३ हजार ४४१ कोटी इतका होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल १६.७४ कोटींची वाढ झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. मात्र, यावर आता विरोधी पक्षाकडून तीव्र टीका केली जात आहे. आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पावर आक्षेप घेत खरमरीत शब्दांमध्ये टीका केली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ‘बुलेट ट्रेनला विरोध, मेट्रो कारशेडचा खेळखंडोबा, कारभारी नव्या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करणार, आणि पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार! चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतीक दर्जाच्या सुविधा असतात काय?’, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पाबाबत सवाल केला आहे.

‘कमी व्याजावर ७७ हजार कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देणारी महापालिका, दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरणार, एकिकडे महसूलात घट, कर्ज घेणार सांगणारी महापालिका म्हणतेय अर्थसंकल्पाचे आकारमान १६.७४ टक्क्यांनी वाढणार. फसलेला ताळमेल अन् सगळा आकड्यांचा खेळ!’, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

‘समुद्राचे पाणी गोडे करणे, वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे हे सारे पाहिले की हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?कारभाऱ्यांची कोणतीही चमकदार कामगिरी नसलेला, धनदांडग्यांना केलेल्या सवलतींच्या वर्षावामुळे ५ हजार ८६७ कोटी महसूलात घट असलेला, पालिकेला ५ हजार ८७६ कोटींनी कर्जबाजारी करणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे, रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट आणि कारभाऱ्यांचा उगाचबाजीरावांचा थाट!’, असंही शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.