घरCORONA UPDATECorona Fighter : कुटुंबाला गावी पाठवून दोन महिने राहिले एकटे!

Corona Fighter : कुटुंबाला गावी पाठवून दोन महिने राहिले एकटे!

Subscribe

भांडुपच्या एस विभागात कोरेानाबाधित रुग्णांची संख्या ही कमी जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे इतर वॉर्डाच्या बरोबरीने या वॉर्डात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी अधिक होत असली तरी आजही या भागातील संख्या पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. मात्र, कोरोनाचा कहर सुरु होताच या विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी आपल्या बायको, मुलीला गावी पाठवून दिले होते. कुटुंबाविना एकाकी जीवन जगतानाच विभागातील जनतेला कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. मात्र, ज्या भीतीपोटी आणि चिंतेपोटी बायको आणि मुलीला गावी पाठवले, तेच त्यांचे कुटुंब ‘आम्हाला कोरेाना झाला तरी चालेल, पण आपण एकत्र राहू’ असे सांगत पुन्हा मुंबईला परतले आणि त्यांना कोरेानात अधिक जोमाने काम करण्याची हिंमत दिली.

भांडुप, कांजूरमार्ग, नाहूर, विक्रोळी आणि पवई आदी भागातील महापालिकेच्या एस विभागात ९ एप्रिल रोजी अवघे २२ रुग्ण होते. परंतु आजमितीस ५७९७ एवढे एकूण रुग्ण झाले आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादी दहाव्या क्रमांकावर असलेला हा विभाग २० जुलै रोजी कोरोना बाधितांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. यातील ४ हजार १७५ एवढे रुग्ण बरे झाले असून १ हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. विशेष म्हणजे भांडुप खिंडीपाड्यासह सुर्या नगर, टागोर नगर आदी भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. परंतु या कालावधीत ३५७ रुग्णांचे मृत्यू झाले. या एप्रिलच्या शेवटच्या पंधरा दिवसापासून ते पुढे जुनच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात खाटा तसेच रुग्णवाहिका सेवा मिळवून देताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, एस विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे आणि विभागीय वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने याठिकाणची परिस्थिती उत्तमपणे हाताळली.

- Advertisement -

महापालिकेच्या दुय्यम पदावर अभियंता म्हणून कार्यरत असणारे संतोषकुमार धोंडे हे २०११ मध्ये सहायक आयुक्तपदी निवड झाली. महापालिकेचा अभियंता ते सहायक आयुक्त अशी जबाबदारी पार पाडणाऱ्या धोंडे यांना एस विभागात कोरोनाच्या उपाययोजना राबवताना प्रसंगी एकटे राहून कर्तव्य निभावावे लागले. ते म्हणतात, कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात येताच मी बायको आणि मुलीला गावी पाठवून दिले. आपण दिवसभर कोरोनाच्या रुग्णांचा मागोवा घेत फिरणार, त्यांची व्यवस्था करणार तसेच मग यामुळे बाधित क्षेत्रातही जावे लागेल. त्यामुळे जी काही बाधा होईल ते आपल्याला होवू द्या, पण आपल्या कुटुंबाला याचा संसर्गही होवू नये, म्हणून गावी पाठवले. या कालावधीत मी दीड ते दोन महिने कुटुंबाशिवाय राहत होतो. त्यावेळी सकाळ आणि रात्र यामधला कधी फरक कळलाच नाही. कधीही रुग्ण यायचे आणि त्यांचे मग नियोजन करण्यात वेळ जायचा. कुटुंब नसल्याने रात्री उशिरापर्यंत मला या कामात झोकून देता येत होते. त्यावेळी तर मी क्वारंटाईनमध्ये जे जेवणे दिले जायचे, तेच जेवण जेवायचो. खरे तर त्या जेवणाबाबत काहीजण तक्रारी करायचे. पण मी त्याच जेवणावर दीड ते दोन महिने काढले. त्यामुळे घरी जावून माझे मलाच करावे लागत असे. ऑफिसमध्ये बॉस असलो तरी घरी कुणी नसल्याने सर्व कामे स्वत:ची स्वत:च करावी लागायची. जेव्हा घरी यायचो तेव्हा अनेक रुग्णांना दाखल केल्यानंतर त्यांचे होणारे मृत्यू आणि नातेवाईकांचा आक्रोश हा मन विषण्ण करून टाकायचा. पण पुढे पुढे भावनाही मरत गेल्या.

मी कुटुंबाला या आजाराच्या भितीपोटी आणि त्यांच्या चिंतेपोटी गावी पाठवले होते. तसे बघितले तर एस विभागात बाधित रुग्ण तेवढ्याच प्रमाणात मिळतात. पण माझ्या कुटुंबाने माझ्या चिंतेपोटी मग निर्धार केला. बस्स झाले, कोरोना झाला तरी चालेल. पण सर्वांनी एकत्रच राहिलेच पाहिजे आणि ते मुंबईला परतले. मागील महिन्यात ते मुंबईला आल्यानंतर आम्ही योग्यप्रकारची काळजी घेवूनच राहत आहोत. कोरेानाला घाबरून जायची गरज नाही. तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसे बघायला गेले तर एस विभागातील बहुतांशी कर्मचारी कोरोनाबाधित निघत होते, आमचा सहायक अभियंता पॉझिटिव्ह निघाला होता. पण आम्ही सॅनिटायझेशन करून दैनंदिन सेवा सुरु ठेवल्या. एक वेळ तर अशी आली की मी सहज म्हणून ऑक्सिमीटरद्वारे माझे ऑक्सिजन मोजण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते प्रमाण ९० च्याही खाली गेले होते. त्यावेळी थोडाफार घाबरलो होतो. पण पुढे काळजी घेतली आणि काही तासांनी पुन्हा तपासले तेव्हा ऑक्सिजन वाढलेले दिसले होते.

- Advertisement -

माझ्या विभागातील प्रत्येक कर्मचारी प्रशिक्षित आहे. त्यामुळे सुरुवातीला जरी तो घाबरत असला तरी आज तो मनाने कणखर बनला. त्या जोरावर काळजी घेत माझे सर्व सहकारी योग्यप्रकारे काम करत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, गृहनिर्माण संस्था, स्थानिक मंडळे यांच्याकडून काही सहकार्य मिळत आहे, त्यामुळेच एस विभागात कोरोनाच्या या आजारांवर मोठ्याप्रमाणात नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश मिळाले आहे. पण त्याबरोबरच महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, परिमंडळांचे उपायुक्त यांचे वारंवार मिळणारे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे महापालिकेचा प्रत्येक कर्मचारी जिद्दीने काम करताना दिसतो, असे ते सांगतात.

हेही वाचा –

सचिन पायलट यांना ३ दिवसांची मुदतवाढ! उच्च न्यायालयाचा दिलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -