एपीएमसीतील लिलावगृह शेतकर्‍यांसाठी आधारस्तंभ : शरद पवार

नवी मुंबई : द्राक्षांवर प्रक्रिया करून तयार होणार्‍या बेदाण्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या वर्षी आपल्या राज्यात बेदाण्याचे उत्पादन एक लाख टन इतके झाले होते. यंदा सर्वत्र द्राक्षाच्या बागा चांगल्या फुलल्या असल्याने हे बेदाण्याचे उत्पादन दोन लाख टनापर्यंत जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सुरु करण्यात आलेले बेदाण्यांचे लिलावगृह शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यासाठी वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

बेदाण्यांचा जाहीर लिलाव तासगावच्या बाजार समितीमध्ये होत आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये बेदाण्यांचा लिलाव करण्यासाठी बेदाणे जाहीर लिलाव सौदे बाजार सुरू करण्यात आला आहे. या लिलावगृहाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मार्केट यापुर्वी मुंबईत होते तेव्हा लाखो रुपयांमध्ये व्यापार होत होता. मात्र हेच मार्केट नवी मुंबईत आल्यानंतर व्यापार्‍यांचा व्यापार वाढीस लागला असून आजमितीस कोटींच्या घरात उलाढाल गेली आहे. मार्केटचा विकास करण्यात शेतकरी, व्यापारी आणि अन्य घटक यशस्वी झाले आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये सुरू झालेल्या बेदाणे सौदे बाजारामुळे राज्यभरातील शेतकर्‍यांना आपला बेदाणा थेट या ठिकाणी पाठवता येणार आहे.

स्थानिक बाजारापेक्षा या ठिकाणी त्याला निश्चित चांगला दर मिळणार आहे. त्यामुळे हे लिलावगृह शेतकरी, व्यापारी आणि माथाडी कामगारांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार दिपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, एपीएमसीचे माजी अध्यक्ष अशोक डक, शिवाजी पवार, माजी खासदार आनंद परांजपे, एपीएमसीचे संचालक विजय भुतो, संजय पानसरे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते.

किलोला ६० रुपये अधिक मिळाल्याने शेतकरी आनंदी
शरद पवार यांच्या उपस्थित या लिलावगृहात बेदाण्यांचा आज लिलाव करण्यात आला. हे सर्व बेदाणे सांगलीतील शेतकर्‍यांनी पाठवलेली होती. तासगावच्या बाजार समितीमध्ये बेदाण्यांना २९० रुपये किलोचा दर मिळाला. मात्र आज एपीएमसी मार्केटमध्ये झालेल्या लिलावात बेदाणे सुमारे ३५१ रुपये किलो या दराने विकले गेले. शेतकर्‍यांना किलो मागे सुमारे ६० रुपये जास्त मिळाले. याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर यावेळी पहावयास मिळाला.