घरमुंबईसरकारी कर्मचारी संपामुळे पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गर्दी

सरकारी कर्मचारी संपामुळे पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये गर्दी

Subscribe

संपामुळे हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या करण्यात अडचणी येत असल्याने बुधवारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. तर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

सातवा वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या दुसर्‍या दिवशीचा परिणाम मुंबईतील राज्य सरकारच्या विविध हॉस्पिटलमध्ये दिसून आला. या हॉस्पिटलांमध्ये शस्त्रक्रिया हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच झाल्या. त्यामुळे आंतर रुग्ण विभागातील रुग्णांचे हाल झाले आहेत. या संपामुळे हॉस्पिटलमध्ये विविध तपासण्या करण्यात अडचणी येत असल्याने बुधवारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली. तर पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संपाचा काही अंशी रुग्णांना मंगळवारी फटका बसल्याने अनेकांनी बुधवारी हॉस्पिटलमध्ये न येणेच पसंत केल्याचे दिसून आले. तर काही रुग्णांनी पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जाणे पसंत केले. जे.जे. हॉस्पिटलमध्ये दररोज तीन हजारपेक्षा अधिक बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असताना बुधवारी हा आकडा दोन हजार ९१७ वर आला. जीटी व सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये दररोज ९०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत असताना बुधवारी अनुक्रमे ५७९  ते ६६७  रुग्णच उपचारासाठी आले. तर कामा हॉस्पिटलमध्ये १२१ रुग्ण बाह्यरुग्ण उपचारासाठी आले. जे.जे., जी.टी. सेंट जॉर्जेस व कामा हॉस्पिटलमध्ये संपामुळे रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी महापालिकेच्या केईएम, नायर, सायन या हॉस्पिटलमध्ये बाह्यरुग्ण विभागात गर्दी वाढलेली दिसून आली. केईएम हॉस्पिटलमध्ये दररोजपेक्षा बाह्यरुग्ण विभागात १० टक्के अधिक रुग्ण आल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

- Advertisement -

रुग्णांची रक्ततपासणी व्हावी यासाठी जे.जे. हॉस्पिटलमधून एक डॉक्टर व काही विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी रक्ततपासणी चाचण्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. तसेच काही महत्त्वाच्या चाचण्या करण्यासाठी रक्त जे.जे. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्या, अशी माहिती जी. टी. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास मैदांड यांनी दिली.

उपचार केलेल्या रुग्णांची संख्या
हॉस्पिटल                           जे. जे       सेंट जॉर्जेस       जी टी           कामा
ओपीडी                             २९१७        ६६७           ५७९             १२१
कॅज्युलटी                            ४९             ७            १६                 ०
शस्त्रक्रिया                           १२              ७             ०                 ०
प्रसूती                                ४                ०              ०                 ०

- Advertisement -

फार्मासिस्ट नसल्याने औषध नाही
संपादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हॉस्पिटलकडून तयारी करण्यात आली होती. सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये दुपारनंतर उपचारासाठी गेलेल्या एका रुग्णाला फार्मासिस्ट नसल्याने औषधेच देण्यात आली नाहीत. याबाबत त्याने निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी चुकीचे औषध दिले जाऊ नये यासाठी फार्मासिस्ट नसल्याने औषध देणे बंद केले आहे. पण अपघात विभागात आम्ही तातडीने औषधे उपलब्ध करत आहोत, असे निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून त्यांना सांगण्यात आले.

युनियनमधील मतांतरामुळे रुग्णांना दिलासा
संपाच्या पहिल्या दिवशी सर्वच कर्मचारी कामावर रूजू झाले नव्हते. परंतु युनियनमधील काही युनियनने माघार घेतल्याने त्या युनियनशी संबंधित कर्मचारी बुधवारी कामावर रूजू झाले. त्यामुळे क्ष किरण, ईसीजी व टेलिफोन ऑपरेटर व चतुर्थ श्रेणीचे पाचजण असे १२ कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे रुग्णांची सानोग्राफी, एक्स-रे व रक्त तपासणी करण्यात आल्याने रुग्णांना दिलासा मिळाला, असे जी. टी. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास मैदांड यांनी सांगितले.

संपामुळे जे.जे. हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया विभाग बंद असल्याने हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी तातडीची शस्त्रक्रिया असलेल्या दोन रुग्णांना व डायलिसिसच्या आठ रुग्णांना पाठवत असल्याचे सकाळी दूरध्वनी करून सांगितले. सरकारी नियमानुसार त्यांना मदत करण्याचे आम्ही आश्वासन दिले व त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया व डायलिसिस केले. तसेच आमच्याकडील बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढली.
– डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -