घरमुंबईजळगावचा धक्का..

जळगावचा धक्का..

Subscribe

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो त्याचप्रमाणे कोणी कायमचा कोणाचा मित्रही नसतो याचा प्रत्यय आता भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांना येऊ लागला असेल. काँग्रेस राष्ट्रवादीतील ज्या आमदारांच्या आणि नेत्यांच्या बळावर भाजपने राज्यातील सत्ता काबीज केली होती त्याच नेत्यांनी आता सत्तेचे वारे फिरताच भाजपला पाठ दाखवण्यास सुरुवात केली आहे. या आयाराम गयाराम वृत्तीमुळेच भाजपला कोल्हापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या महापालिका स्वतःच्या हातातून गमवाव्या लागल्या. तर आता पश्चिम महाराष्ट्रातील ऑन उत्तर महाराष्ट्रातील जळगाव महापालिकेतही कालच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिसून आले.

स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना सत्तेची संधी देण्याऐवजी जेव्हा पक्ष नेतृत्व हे आयाराम आणि गयारामाना अधिक महत्त्व देते तेव्हा त्या पक्षास असे फटके हे बसणारच हे राजकारणातलं सर्वसाधारण गृहीतक समजले जाते. हे गृहितक केवळ भाजपलाच लागू आहे असे नाही तर सर्वपक्ष या गृहीतकाच्या समीकरणात परफेक्ट बसतात. मात्र भाजपा हा नेहमीच स्वतःला भारतीय राजकारणात साधन सूचनेचा पक्ष म्हणून वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे साधनशुचितेच्या गप्पा मारणार्‍या भाजपसारख्या पक्षाला जेव्हा आयाराम आणि गयारामांमुळे एकापाठोपाठ एक अशा तीन महापालिकांमधील सत्ता गमवावी लागते भाजपसारख्या केडर बेस पक्षाने याबाबत अधिक सतर्कता आणि सावधानता बाळगण्याची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरवशावर राहता कामा नये. राज्य पातळीवर यांनी आपली ताकद आणि प्रभाव वाढवण्याची गरज आहे. अन्यथा पक्षाला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही, हे या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे.

- Advertisement -

उत्तर महाराष्ट्र म्हटला खान्देश, जळगाव, चाळीसगाव हे ओघाने आलेच. मात्र त्याच बरोबर जळगाव जिल्हा म्हटला की भाजपचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचाही उल्लेख क्रमप्राप्त ठरतो. एकनाथ खडसे हे भाजपचे अत्यंत जुनेजाणते निष्ठावंत कार्यकर्ते आणि त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठबळामुळे उदयास आलेले जळगाव खान्देशमधील नेतृत्व होते. 2014 सली महाराष्ट्रामध्ये तसेच देशात सत्तांतर झाले आणि देशामध्ये मोदी पर्व सुरू झाले. त्याच्याही आधी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे जेव्हा तरुण आणि तडफदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली. वास्तविकपणे तेव्हापासूनच एकनाथ खडसे यांचा भाजपमधील उतार काळ सुरू झाला होता. जेव्हा 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या ही पुढे प्रथम क्रमांकावर मुख्यमंत्रीपदासाठी जे नाव होते ते होते एकनाथ खडसे यांचे.

पक्षातील सर्वात वरिष्ठ नेते म्हणून वास्तविकपणे मुख्यमंत्रीपदावर अधिकार देखील एकनाथ खडसे यांचाच होता. वास्तविक खडसे यांना शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीनही सक्षम पर्याय उपलब्ध होते. मात्र खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करताना राज्याच्या सत्तेचे प्रमुख केंद्र शरद पवार आहेत हे विचारात घेऊन राष्ट्रवादी प्रवेश केला असावा. मात्र असे करत असताना त्यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेणे काहीच गरजेचं होतं असं त्यांच्या समर्थकांना आता वाटत आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा फडकलेला भगवा हा जसा भाजपला धक्का आहे तसाच तो राष्ट्रवादीलाही धक्कादायकच म्हणावा लागेल.

- Advertisement -

मात्र नरेंद्र मोदी यांच्या लाटेमध्ये जसे विरोधी पक्षांचे बालेकिल्ला उध्वस्त झाले त्याच प्रमाणे भाजपमध्ये जे मोदी आणि शहा यांना नकोसे असलेले नेते होते त्यांना देखील घरी बसवण्याचे काम मोदी लाटेने केले हे मोदी लाटेचे एक वेगळे स्वतंत्र वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. त्यामुळे मोदी लाटेचा फटका केवळ विरोधकांनाच बसला असं नव्हे तर भाजपतील प्रस्थापित नेत्यांना देखील मोदी लाटेने तडाखे दिले आणि त्याच तडाख्याचे एकनाथ खडसे हे बळी ठरले. त्यातही भाजपातील राज्यातील नेतृत्वाचा जो वाद होता तोदेखील खडसे यांच्या मुळावर आला. त्यातूनच खडसे यांचे मंत्रिपद गेले, चौकशी लागली, भाजपची राज्यात सत्ता असताना देखील खडसे यांची चौकशी लांबवली गेली आणि त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश कसा होणार नाही याची पूर्ण काळजी तत्कालीन भाजप नेतृत्वाने घेतली. याहीपेक्षा वाईट म्हणजे विधान परिषदेवर जेव्हा आमदार म्हणून खडसे सहजगत्या येऊ शकले असते तेव्हा देखील त्यांचा पत्ता कापण्यात आला. जेव्हा खडसे यांना आता भाजपात त्यांना कोणतेही भवितव्य उरलेले नाही हे लक्षात आले तेव्हा त्यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला.

मात्र येथेदेखील खडसे यांचा निर्णय चुकला असे त्यांच्या समर्थकांना आता वाटू लागले आहे. त्याचे कारण कालच्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा फडकलेला भगवा हे असू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील आपला ढासळलेला बुरुज सावरायला राष्ट्रवादीने कोल्हापूर आणि सांगली या महापालिकापासून सुरुवात केलीच आहे तर शिवसेनेने जळगावसारखी महापालिका सत्तेच्या बळावर काबीज केली आहे. त्यामुळे भाजपला एकाच वेळी शिवसेना राष्ट्रवादी आणि त्यातूनही काँग्रेस या तिन्ही पक्षांशी एकाच वेळी सामना करावा लागत आहे तो अधिक धोकादायक आहे. त्यामुळे या तिन्ही पराभवापासून भाजपने अधिक सावधानता आणि सतर्कता बाळगण्याची गरज आहे. एकीकडे राज्यातील भाजपचे नेतृत्व मग ते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस असतील,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर असतील, माजी खासदार किरीट सोमय्या असतील व भाजपातील अन्य राज्यस्तरीय नेते असतील ते राज्यात सातत्याने शिवसेनेला आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे अधिकाधिक प्रयत्न करत आहेत. मग त्यामध्ये माजी वन मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण असेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात खरेदी केलेल्या जमिनीचे ऊकरून काढलेले प्रकरण असेल किंवा आता सध्या राज्यात गाजत असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे प्रकरण असेल.

ही अशी सत्ताधारी पक्षाला विशेष हा शिवसेनेला अडचणीत आणणारी प्रकरणे काढून मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचे डावपेच भाजपच्या राज्य नेतृत्वाकडून सुरू असताना दुसरीकडे राज्यातील महापालिकामध्ये मात्र भाजपची मंडळी ही भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात आहेत हे भाजप साठी नक्कीच चांगले लक्षण नाही असेच म्हणावे लागेल. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात भाजपचे नंबर दोनचे नेते समजले जाणारे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव महापौरपदाच्या निवडणुकीची जबाबदारी होती आणि निवडणुकीच्या दिवशी गिरीश महाजन हे सातत्याने प्रसारमाध्यमांना जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असे छातीठोकपणे सांगत होते. मात्र प्रत्यक्षात भाजपचे तब्बल 27 नगरसेवक जळगाव महापालिकेत फुटले आणि शिवसेनेला त्यांनी मतदान केले. फाटाफुटीचे ही घडामोड जळगावमध्ये एका आठवड्या आधीपासून सुरू होती त्यामुळे त्याची पूर्वकल्पना गिरीश महाजन यांच्यासारख्या वरिष्ठ भाजपा नेत्याला असू नये असे समजण्याचे काही कारण नाही. मात्र त्यानंतरही जर भाजपचे नेते अंधारात राहत असतील तर अशा पक्ष नेत्यांचे आणि पक्षाचे ही भवितव्य हे अंधकारमय होते हे लक्षात घेण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -