घरमुंबईनाराज आमदारांना समजवताना भाजप नेत्यांची त्रेधातिरपीट

नाराज आमदारांना समजवताना भाजप नेत्यांची त्रेधातिरपीट

Subscribe

मुंबई: भाजपच्या विदर्भातील दोन लोकप्रतिनिधींनी तिथली आमदार आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर इतर असंतुष्टही आता माना वर काढू लागले आहेत. अशा नाराजांची नाराजी दूर करण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपला हाती घ्यावा लागण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपवासी झाले होते. या आमदारांना सरकारमध्ये कुठलेही स्थान नाही. महामंडळावरील नियुक्तीपासूनही त्यांना पध्दतशीरपणे दूर ठेवले. याचे विपरीत परिणाम आगामी काळात दिसण्याची भीती भाजप नेतृत्वाला वाटू लागली आहे. त्यामुळे अशा आमदारांची मनधरणी करताना भाजप नेत्यांची त्रेधातिरपीट उडत आहे.

भाजपचे कटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी आमदारकीचा आणि भाजपच्या सामान्य सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून भाजपमध्ये अशा नाराज आमदारांना वाचा फुटू लागली आहे. याआधी भंडार्‍याचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. पुढे तिथे पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला. या पार्श्वभूमीवर सरकारविरोधातील वातावरण हळूहळू तापू लागले आहे. या दोन लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्यानंतर पक्षातल्या असंतुष्ट आमदारांना नव्याने बळ मिळाले आहे. ज्यांच्या ताकदीवर राज्यात सरकार स्थापन करण्यात आले त्या आमदारांना सत्तेपासून पक्षाने चार वर्षे दूर ठेवल्याची सल या आमदारांना आहे.

- Advertisement -

नुकत्याच जाहीर झालेल्या महामंडळांच्या नियुक्तीतही या आमदारांना कुठेच स्थान देण्यात आले नाही. यामुळे तर आगीत तेल ओतण्यासारखी परिस्थिती पक्षात झाल्याचे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मान्य केले. ही डोकेदुखी दूर कशी करायची या विवंचनेत नेते अडकले आहेत. एकीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षात शड्डू ठोकला असताना नव्याने धुळ्यात अनिल गोटे यांनी पक्षाला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

धुळ्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गोटे यांना दूर ठेवून पक्षाने तिथल्या निवडणुकीची जबाबदारी जळगावकर मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे दिल्याने गोटे प्रचंड संतापले आहेत. एका कार्यक्रमात तर गोटे यांनी ‘आम्ही झक मारायला आमदार झालो’, असा सवाल करत भाजपच्या नेत्यांची बोलती बंद केली होती. गोटे पक्षात कोणाचीच मुलाहिजा ठेवत नाहीत. सडेतोड बोलण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही.

- Advertisement -

१५ आमदार संतप्त

अनिल गोटेंसारखेच भाजपत किमान १५ आमदार नेतृत्वावर संतापले आहेत. कोणत्याही वेळी ते काहीही निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात आहे. या आमदारांना अनेक आश्वासने देण्यात आली. पण ती पूर्ण करणे राहो दूर. उलट मंत्रालयात गेल्यावरही कामे होत नसल्याची ओरड हे आमदार उघडपणे करतात. त्यांच्या या कृतीचा अंदाज भाजपच्या नेतृत्वालाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -