घरमुंबईअनंत अमुची  ध्येयासक्ती  

अनंत अमुची  ध्येयासक्ती  

Subscribe

अंध तरूणांकडून किलिमांजारोवर चढाई 

दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी पर्वतरांग असलेले किलिमांजारोवर यशस्वी चढाई करणारे प्रसाद गुरव व दिव्यांशु गणात्रा हे भारतातील पहिले अंध  गिर्यारोहक ठरले आहेत. या दोघांनी आपल्या अंधत्त्वावर मात करत मोठ्या धाडसाने किलिमांजारोवर चढाई करत अंधाप्रमाणेच डोळस व्यक्तींसमोरही आदर्श ठेवला आहे.आयुष्यात आलेल्या अडचणींना कवटाळून बसल्यावर त्या आयुष्यासाठी अडथळे ठरतात. परंतु त्यांच्याकडे आव्हान म्हणून पाहिल्यास ते आयुष्याला दिशा देतात. या आव्हानाचा सामना करताना त्यातून पराकोटीचा आनंदही अनुभवायला मिळतो, अशी प्रतिक्रिया प्रसाद गुरव व दिव्यांशु गणात्रा यांनी व्यक्त केली.
पुण्यामध्ये राहणारे प्रसाद गुरव (वय 44) यांनी वयाच्या 15 व्या वर्षी ट्रेकिंगला सुरुवात केली. परंतु 20 व्या वर्षी आजारपणामुळे त्यांची दृष्टी कमी झाली व त्यानंतर 23 व्या वर्षी ती पूर्णत: गेली. दृष्टी गेल्यामुळे प्रसाद पूर्णत: खचले होते. त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते. पण घरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांनी यातून मार्ग काढत आयटी क्षेत्रामध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यानंतर प्रसाद यांनी आपली आवड असलेल्या ट्रेकिंगकडे पुन्हा मोर्चा वळवला. दृष्टी जाण्यापूर्वी प्रसाद यांनी अनेकदा ट्रेकिंग केली होती. ती आवड पुन्हा जोपासण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सुरुवातीला पश्चिम घाटामध्ये ट्रेकिंग करण्यास त्यांनी सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी चार वेळा हिमालयामध्ये ट्रेकिंग केले. त्याचप्रमाणे पुणे ते गोवा अशी 31.5 तास सायकलिंग करत त्यांनी ‘हम किसी से कम नही’ हे दाखवून दिले. याच अनुभवाच्या जोरावर प्रसाद यांची या ट्रेकिंगसाठी निवड झाली. परळमधील भोईवाडा येथे प्रसाद यांचे लहानपण गेले. इंजिनियरचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते गोरेगाव येथे राहण्यासाठी गेले. परंतु आजारामुळे अंधत्व आल्यानंतर ते पुण्यामध्ये राहण्यास गेले. त्याचप्रमाणे दिव्यांशू गणात्रा (वय 42)यांचीही काही वर्षांपूर्वी आजारामुळे दृष्टी गेली. परंतु त्यातून सावरत त्यांनीही अनेक ट्रेक केले आहेत.
अंध व अपंग असलेल्या व्यक्तींना सक्षम व्यक्तींनी साथ दिली तर ते सुद्धा मोठमोठी यशाची शिखरे सहज पार करू शकतात, हे आम्हाला जगाला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच आम्ही या मोहिमेत सहभागी झालो. आमच्यासोबत असलेल्या अन्य 10 जण व आमचे मार्गदर्शक यांच्या मदतीमुळे आम्ही किलिमांजारोवर यशस्वी चढाई करू शकलो. आम्ही दररोज तीन ते चार तासांमध्ये 800 मीटरचा प्रवास करायचो. दोन हजार मीटर अंतर पूर्ण केल्यानंतर आम्हाला वातावरणातील बदल जाणवू लागले. पण आमच्यासोबत असलेले अन्य सदस्य व मार्गदर्शकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला चढाई करण्यास मदत झाली. भविष्यात आम्हाला अनेक चढाया अन्य अंध व अपंग व्यक्तींना घेऊन करायच्या आहेत. या व्यक्तींना आमच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे प्रसाद गुरव यांनी सांगितले.

भारतातील पहिले ‘इनक्ल्युसिव्ह क्लाईम्ब’

अ‍ॅडव्हेंचर्स बियाँड बॅरियर्स फाऊंडेशन या संस्थेतर्फे 8 ते 14 सप्टेंबरदरम्यान पहिल्या ‘इनक्ल्युसिव्ह क्लाईम्ब’चे आयोजन केले होते. यात भारतातून प्रसाद गुरव व दिव्यांशू गणात्रा हे दोन अंध व इस्त्रायलमधून एक अंध व्यक्ती तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेले 10 जण सहभागी झाले होते. ‘इनक्ल्युसिव्ह क्लाईम्ब’मध्ये सहभागी झालेल्या 13 जणांनी अवघ्या सहा दिवसांमध्ये 5895 मीटर उंच असलेले किलिमांजारोवर यशस्वी चढाई केली.
गाईड तयार होत नव्हते अंध असल्यामुळे या चढाईसाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोणी मार्गदर्शक तयार होत नव्हता. परंतु त्यांची आम्ही भेट घेतल्यावर व त्यांच्याशी चर्चा केल्यावर ते मार्गदर्शनासाठी तयार झाले. पण त्याही वेळेस त्यांनी जितके जाता येऊ शकते तितके जाऊ असे सांगत त्यांनी होकार दिल्याचे दिव्यांशू गणात्रा यांनी सांगितले.
अ‍ॅडव्हेंचर्स बियाँड बॅरियर्स फाऊंडेशनची (एबीबीएफ) मी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असल्यामुळे अंधांसाठी काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. परंतु आर्थिक मदत मिळवण्यात बर्‍याच अडचणी आल्या. भारतातून मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. याउलट दक्षिण आफ्रिकेतून चांगल्या प्रकारे मदत मिळाली.
अनुशा सुब्रह्मण्यम, 
ब्रँड अ‍ॅम्बेसिडर, एबीबीएफ
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -