घरमुंबईदहिसर नदीवरचा अतिक्रमणाचा विळखा सुटतोय, २५० झोपड्यांवर कारवाई!

दहिसर नदीवरचा अतिक्रमणाचा विळखा सुटतोय, २५० झोपड्यांवर कारवाई!

Subscribe

दहिसर नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतल्यानंतर अखेर मागील अनेक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागू लागली आहेत. बोरीवलीतील दहिसर नदीच्या पात्राच्या रुंदीकरणातील ९५ बांधकामे हटवण्यात आल्यानंतर आता दहिसरच्या हद्दीतील नदीच्या पात्रातील तब्बल अडीचशे झोपड्यांसह बांधकाम हटवण्यात आर- उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

मुंबईत २६ जुलैच्या महाप्रलयानंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला जबाबदार असलेल्या मिठी नदीसह दहिसर, पोयसर, ओशिवरा आदी नद्यांना पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार दहिसर नदीच्या रुंदीकरणासह खोलीकरण करण्याचे काम हाती घेऊन त्यामध्ये बाधित होणाऱ्या बांधकामांना हटवण्यात आले होते. पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केल्यानंतर हटवण्यात आलेल्या झोपड्यांच्या जागी नदी रुंद करताना, महापालिकेने दहिसर नदी जात असलेल्या बोरीवली आणि दहिसर आदी भागांमधील पात्रांमध्ये संरक्षक भिंत उभारण्याचे काम केले. परंतु नद्यांच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनेक बांधकामांमधील पात्र कुटुंबांच्या पुनर्वसनामुळे या नदीच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते.

- Advertisement -

दहिसर नदी ही दहिसरपासून बोरीवलीपर्यंत जात असल्याने बोरीवलीच्या हद्दीतील नदीच्या पात्रातील काही उर्वरीत झोपड्यांपैकी ९५ झोपड्यांवर आर-मध्य विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी मेगा कारवाई करत नदीचे पात्र अतिक्रमणमुक्त केले. मात्र, या सुधीर फडके उड्डाणपुलाच्या खालून उत्तरेच्या दिशेला दहिसरच्या हद्दीत एकूण ४५० झोपड्या तथा बांधकामे आहेत. त्यातील शांतीनगर, इंदिरानगर आणि साईनगर आदी भागातील २०० झोपड्यांवर मंगळवारी आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे. या २०० झोपड्यांपैकी ९० झोपड्या पात्र असल्याने त्या झोपड्यांमधील कुटुंबांचे पुनर्वसन मिरा रोड येथील प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये करण्यात आले आहे. तर उर्वरीत ११० झोपड्या अपात्र ठरल्याने त्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचे आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी सांगितले. महापालिका आर-उत्तर विभागाचे अधिकारी आणि कामगारांसह स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

याशिवाय ५० झोपड्या स्वत:हूनच नागरिक तोडून देत असल्याने पहिल्या टप्प्यात सुमारे २५० झोपड्यांवरील कारवाईची मोहीम पूर्ण केली जाईल. ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर साईनाथ नगर तसेच दुबे रोडच्या परिक्षेत्रातील तब्बल २०० झोपड्यांवरील कारवाई दुसऱ्या टप्प्यात हाती घेतली जाईल. याठिकाणीही सुमारे १०० ते ११० झोपड्या पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या सर्व पात्र कुटुंबांचे पुनर्वसन मिरा रोड येथील प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये केले जाईल, असेही नांदेडकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -