घरCORONA UPDATE'कोरोनाबाधित रुग्णांसाठी जागा नसल्यास अन्य रुग्णालयात व्यवस्था करा' - आयुक्त

‘कोरोनाबाधित रुग्णांसाठी जागा नसल्यास अन्य रुग्णालयात व्यवस्था करा’ – आयुक्त

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेताच शनिवारी रात्री उशिरापर्यंत इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त, विशेष कार्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेवून कोरोनासंदर्भातील कामांचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत चहल यांनी सहायक आयुक्त हे विभागाचे आयुक्त असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे एखाद्या विभागातील रूग्णालयात जागा नसल्यास, ज्या विभागात व्यवस्था होऊ शकते, अशा अन्य विभाग क्षेत्रातील रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी असे निर्देश सहायक आयुक्तांना जारी केले आहे. त्यामुळे यामाध्यमातून आयुक्तांनी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांच्या खांद्यावर निश्चित करून टाकली.

मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी संध्याकाळी महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष आढावा बैठक पार पडली. रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या बैठकीला शासनाने प्रतिनियुक्त केलेल्या विशेष कार्य अधिकारी मनीषा म्हैसकर, प्राजक्ता लवंगारे, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलारसू , संजीव जयस्वाल, उपायुक्त (आरोग्य) रमेश पवार, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह संबंधित उपायुक्त, विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त आणि संबंधित खातेप्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या आढावा बैठकीत आयुक्तांनी, महापालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे अत्यंत समर्पित भावनेने काम करीत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक नियोजनपूर्वक, अधिक प्रभावीपणे काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासाठी आपापल्या कार्यक्षेत्राची परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना त्याच्या अतिनिकट संपर्कातील लोकांना क्वारंटाईन अर्थात अलगीकरण करण्याच्या प्रकारात सध्या हलगर्जीपणा दिसून येत आहे. याची दखल घेत आयुक्तांनी हे काम आणखी प्रभावीपणे आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. सध्या हे प्रमाण एका बाधीत रूग्णाच्या मागे ३ असे दिसते. हे प्रमाण किमान एकाच्या मागे ६ असे असावे, असे त्यांनी सांगितले. यात अतिधोकादायक संपर्कांचा कसून शोध घेतला जायला हवा. झोपडपट्ट्यांमधील असे संपर्क लगेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात स्थलांतरीत करावे,असेही निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

सहायक आयुक्तांना जबाबदारीची जाणीव

सर्व विभागीय सहाय्यक आयुक्त हे त्यांच्या विभागाचे ‘आयुक्त’ आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागात घडणाऱ्या विविध बाबींवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे व आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रात महापालिकेची जी रुग्णालये येतात, त्या रुग्णालयांमधील कार्यवाहीवर लक्ष ठेवणे व तेथील व्यवस्था अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन अपेक्षित कार्यवाही करवून घेणे, ही बाबही सहाय्यक आयुक्तांनी करवून घ्यावयाची आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची ‘बेड’ क्षमता वाढविण्यासह ‘बेड’ व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कार्य व जबाबदाऱ्या यांचे अधिक सुनिश्चित व अधिक परिणाम कारक वाटप करावे. प्रत्येक व्यक्तीला योग्य ती जबाबदारी नेमून द्यावी, त्यांच्यात कार्य करण्याची प्रेरणा व सकारात्मक भावना सातत्याने वृद्धिंगत ठेवावी. तसेच त्यांच्या कामाचे नियमितपणे संनियंत्रण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -