घरCORONA UPDATEचार महिन्यांत २३ सुधारीत परिपत्रके; महापालिकेने रचला कर्मचाऱ्यांच्या परिपत्रकांचा विक्रम

चार महिन्यांत २३ सुधारीत परिपत्रके; महापालिकेने रचला कर्मचाऱ्यांच्या परिपत्रकांचा विक्रम

Subscribe

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थिती दर्शवण्यासाठी प्रशासनाने जी काही सुधारीत परिपत्रके जाहीर केली आहे, ती पाहता आजवर कधीही कोणत्याही विषयांसंदर्भात अशाप्रकारे एवढी परिपत्रके चार महिन्यांमध्ये काढण्याची वेळ प्रशासनावर आली नव्हती. ही सुधारीत परिपत्रके थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २३ परिपत्रके ही केवळ कर्मचाऱ्यांच्या कामावरील उपस्थितीबाबत काढण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात एवढ्याप्रकारे सुधारीत परिपत्रके काढण्याचीही पहिलीच घटना असून महापालिका आणि शासनामध्येही एवढ्या मोठ्या संख्येने परिपत्रके काढण्यात आलेली नसल्याने एकप्रकारे प्रशासनाने परिपत्रक काढण्याचा विक्रमच नोंदवला असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाच्या विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या रोगाचा फैलाव रोखण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने १८ मार्च २०२० रोजी सर्वप्रथम ५० टक्के उपस्थितीचे परिपत्रक काढून आळीपाळीने अर्थात एक दिवस आड याप्रमाणे कर्मचाऱ्यांची सेवा घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर २० मार्च रोजी प्रशासनाने दुसरे परिपत्रक काढून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी न नोंदवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर २३ मार्चपासून मुंबईसह देशात लॉक-डाऊन जारी करण्यात आले. त्यामुळे २३ मार्च रोजी पुन्हा तिसरे परिपत्रक जारी करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासन सातत्याने सुधारीत परिपत्रक जारी करून कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याच्या सूचना करत होते. तर ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कोविड सेंटरच्या ठिकाणी सेवा न घेता अन्य ठिकाणी सेवा घेतली जावी तसेच ज्या उच्च रक्तदाब,मधुमेह तसेच इतर आजार असतील त्यांना सेवा सवलत देणे अशाप्रकारे वेगवेगळ्या पैलूंसाठी परिपत्रक जारी करण्यात आले.

- Advertisement -
bmc circular about employee
महानगरपालिकेचे परिपत्रक

यामध्ये लॉक-डाऊन असले तरीही ५० टक्के हजेरीचे परिपत्रक कायम असल्याने ५० टक्के कर्मचाऱ्यांनी उपस्थिती राहण्याच्या सूचना करणे, तसेच ज्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के नसेल तर त्यांना उपस्थितीएवढा पगार देणे, ५० टक्के किंवा त्यावर अधिक उपस्थिती असेल तर त्यांना पूर्ण पगार यासाठी परिपत्रक काढल्यानंतर प्रशासनाने पुन्हा ७५ टक्के उपस्थितीचे पुन्हा परिपत्रक काढले. त्यानंतर १ जुलै रोजी १०० टक्के उपस्थितीसह बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्याचे परिपत्रक जारी करतानाच ७ जुलै रोजी पुन्हा रुग्णालय आणि आरोग्य खात्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करून उर्वरीत कर्मचाऱ्यांना सवलत देण्याचे सुधारीत परिपत्रक काढण्यात आले. त्यामुळे अशाप्रकारे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत प्रशासनाने कोविडच्या काळातच म्हणजे १८ मार्च ते ७ जुलै २०२० या कालावधीत मूळ आणि त्यावर २३ सुधारीत परिपत्रके जारी केली आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत महापालिका प्रशासनाने कोणत्या दिव्यातून जावे लागले हे दिसून येत आहे.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोविडच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवांची मदत घेतली जात असली तरी इतर प्रशासकीय व महापालिकेची कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. तसेच कोविडमुळे जे बाधित कर्मचाऱ्यांचे प्रमाण होते याही बाबी विचारात घेवून ही सुधारीत परिपत्रके काढली गेली.

- Advertisement -

१८ मार्च २०२० पासून : ६ परिपत्रके

एप्रिल २०२० : ५ परिपत्रके

मे २०२० : ६ परिपत्रके

जुन २०२०: ४ परिपत्रके

जुलै २०२० : २ परिपत्रके

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -