घरमुंबईतुमचं खासगी पार्किंग आता होणार सार्वजनिक?

तुमचं खासगी पार्किंग आता होणार सार्वजनिक?

Subscribe

मुंबईतल्या पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने कंबर कसली असून आता खासगी पार्किंगचा देखील सार्वजनिक वापरासाठी वापर करण्याचा विचार प्रशासन करत आहे.

मुंबई शहरातल्या पार्किंगच्या समस्येचा अनुभव प्रत्येक मुंबईकराने किमान एकदा तरी घेतलाच असेल. मुंबईत कुठे जायचं असेल तर ‘आधी तिथे पार्किंग आहे का? तरच तिथे जा’, अशा पद्धतीने प्लॅनिंग करावं लागतं. शिवाय पार्किंगच्या जागेच्या प्रचंड तुटवड्यामुळे पार्किंग माफियांचे रॅकेटही उघडकीस आल्याचं आपण ऐकलं आहे. त्यामुळे पार्किंग प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचं आश्वासन मुंबईच्या बहुचर्चित विकास आराखडा २०३४मध्ये प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. आणि आता त्यासाठीच मुंबईकरांच्या खासगी पार्किंग जागेचाही सार्वजनिक पार्किंगसाठी वापर करण्याच्या पर्यायाचा प्रशासन गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘मिड-डे’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सल्लागाराच्या सल्ल्यानेच निर्णय घेणार

मुंबई शहरातील खासगी पार्किंगच्या जागा, विशेषत: रहिवासी सोसायट्यांमधल्या पार्किंगच्या जागेचा यासाठी वापर करण्याचं प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मुंबई महानगर पालिकेकडून यासाठीच्या शक्याशक्यता पडताळून पाहिल्या जात असून त्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचंही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, सल्लागाराने अहवाल दिल्यानंतरच यासंदर्भातली मार्गदर्शक नियमावली बनवण्यात येणार आहे. सार्वजनिक रस्त्यांवरच्या पार्किंगचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य पर्यायांचा अभ्यास करण्याची प्रमुख जबाबदारी या सल्लागारावर असणार आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आता गटारांवरच वाहनतळ


विशेष मंडळाची स्थापना करणार

याशिवाय, पार्किंग समस्येवर उपाय शोधण्याची प्रक्रिया नियमित करण्यासाठी एका विशेष मंडळाची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे. या मंडळामध्ये ट्रॅफिक पोलिस, स्वयंसेवी संस्था, आरटीओ, मुंबई महानगर पालिका या संस्थांच्या प्रतिनिधींसोबतच या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीही असणार आहेत.

- Advertisement -

प्रभाग अधिकाऱ्यांना आयुक्तांचे निर्देश

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात एक आढावा बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीमध्ये मुंबईतल्या सर्व २४ प्रभागांमधील प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागांमधील संभाव्य पार्किंगच्या जागेसंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, पार्किंगसाठी खासगी जागा पूर्ण दिवसभर न वापरता फक्त दिवसाचे काही तासच उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करत असल्याचंही सूत्रांनी नमूद केलं आहे.


हेही वाचा – पार्किंग समस्येला रेड सिग्नल कधी मिळणार?

Pravin Wadnerehttps://www.mymahanagar.com/author/pravin/
समाजाशी बांधिलकी, बदल घडवण्याची प्रामाणिक इच्छा, त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी आणि त्याच तयारीचा एक भाग म्हणून माध्यमांमध्ये प्रवेश. लेखनाची आवड, त्यासाठी वाचनाची निवड. सोबतीला फोटोग्राफीचा छंद, जगण्यासाठी अजून काय पाहिजे?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -