घरक्राइममुंबईत फक्त ५ हजारांत बोगस जन्म, मृत्यु, विवाह प्रमाणपत्र; एकाला अटक!

मुंबईत फक्त ५ हजारांत बोगस जन्म, मृत्यु, विवाह प्रमाणपत्र; एकाला अटक!

Subscribe

कुठलेही कागदपत्रे न देता मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही वॉर्डातून जन्म, मृत्यु आणि विवाहाचे बोगस प्रमाणपत्र पाच हजार रुपयांमध्ये घरपोच देणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून संगणक संच आणि बोगस प्रमाणपत्रे जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष ५ ने केली आहे. विजय कुमार राय उर्फ विजय कुमार ठाकूर (४१) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून विजय कुमार हा सकिनाक्याजवळील सफेद पूल या ठिकाणी एका चाळीत राहण्यास आहे. उच्चशिक्षित असलेल्या विजय कुमार याने वर्षभरात जवळजवळ ३०० जणांना बोगस प्रमाणपत्र दिले असल्याचे उघडकीस आलेले आहे.

भामट्याकडे सापडले पालिकेचे रबरी शिक्के!

कुर्ला न्यायालय परिसरात एक व्यक्ती बोगस प्रमाणपत्र देण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ च्या महिला पोलीस शिपाई दर्शना साळवी यांना मिळाली होती. कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल, पोनि. योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. महेंद्र पाटील आणि पथक यांनी कुर्ला न्यायालय येथे सापळा रचून विजय कुमार राय उर्फ विजयकुमार ठाकूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ असणाऱ्या बॅगेत पोलीस पथकाला मुंबई महानगरपालिकेचे रबरी शिक्के, उपनिबंधकाच्या बनावट स्वाक्षरी असलेले जन्म,मृत्यू आणि विवाहाचे दाखले सापडले.

- Advertisement -

३०० हून जास्त बोगस कागदपत्र

या प्रकरणी विजय कुमार राय याच्या विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात बोगस दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत त्याने प्रत्येक दाखल्यामागे ५ हजार रुपये घेऊन सुमारे ३०० हून जास्त बोगस प्रमाणपत्र बनवून दिल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. विजयकुमारकडून जप्त करण्यात आलेल्या संगणक संच तपासले जात असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -