घरमुंबई७०व्या वर्षी अवयवदान करून चौघांना दिले जीवदान

७०व्या वर्षी अवयवदान करून चौघांना दिले जीवदान

Subscribe

मुंबईत झाले ४६ वे यशस्वी अवयवदान

अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथे राहणार्‍या ७० वर्षीय चंद्रकांत तारे यांनी अवयवदान करून चौघांना जीवदान दिले. मुंबईच्या क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १७ डिसेंबर या दिवशी हे अवयवदान पार पडले. हे मुंबईतील ४६वे यशस्वी अवयवदान असून चंद्रकांत तारे यांचे चार अवयवदान करण्यात आले.१६ डिसेंबर या दिवशी अंधेरीमध्येच चंद्रकांत तारे यांचा दुर्देवी अपघात झाला. त्यांना तत्काळ क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. त्यांचे इतर अवयव कार्यरत असल्यामुळे त्यांची मुलगी आणि जावई यांनी मिळून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फुफ्फुस, यकृत आणि दोन किडनी हे अवयव दान करण्यात आले. त्यामुळे चार जणांना नव्याने जीवदान मिळण्यास मदत झाली.

या व्यक्तीचे फुफ्फुस कोकिलाबेन धिरूभाई अंबानी, तर यकृत ज्युपिटर आणि दोन्ही किडनी जसलोक हॉस्पिटलमधील रुग्णांना दान करण्यात आल्या. शिवाय त्यांचे हृदय आणि त्वचा देखील दान करण्यात येणार होती. पण, त्यासाठी खूप उशीर झाल्याचे सांगत ते दान करता आले नाही, असे चंद्रकांत तारे यांचे जावई मिहीर देसाई यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना क्रिटीकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे समन्वयक समीर मोरे यांनी सांगितले की, झेडटीसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, चंद्रकांत तारे यांचे अवयव ५० ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींनाच दान करण्यात आले आहेत. त्यांचे अवयव वेगवेगळ्या तीन हॉस्पिटलमध्ये दान केले आहेत. किडनी, लिव्हर आणि फुप्फुस हे अवयव दान करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबईत २३ वे हृदय प्रत्यारोपण
मुंबईत २३वे यशस्वी हृदय प्रत्यारोपण करण्यात आले आहे. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. विशाखापट्टणमला राहणार्‍या १७ वर्षीय तरुणाच्या अवयवदानाने मुंबईतील ५२ वर्षीय व्यक्तीला जीवदान मिळाले. फोर्टिस रुग्णालयातील कार्डियाक स्पेशालिस्ट डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. ही यंदाच्या वर्षातील २३ वी यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती. विशाखापट्टणमध्ये राहणारा हा १७ वर्षीय तरुण इंजिनीयरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. एका रस्ते अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो ब्रेनडेड झाला. या तरुणाच्या कुटुंबीयांचे अवयवदानासंदर्भात समुपदेशन केल्यानंतर त्यांनी अवयवदान करण्यास परवानगी दिली. त्यानुसार या मुलाचे हृदय, यकृत आणि दोन्ही किडनी हे अवयव दान करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -