घरमुंबईउल्हासनगरचे नाव बदलणार? वाचा सत्य परिस्थिती

उल्हासनगरचे नाव बदलणार? वाचा सत्य परिस्थिती

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर उल्हासनगर शहराचे नाव बदलणार म्हणून शहरात अफवा पसरली आहे.

उल्हासनगरमध्ये मेट्रो रेल्वे येणार असून स्थानकाचे नाव सिंधूनगर असेल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा विपर्यास करून काही समाजकंटक उल्हासनगर शहराचे नाव सिंधूनगर करणार असल्याची अफवा पसरवत आहेत. या अफवांमुळे शहरात मराठी आणि सिंधी वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे पोलीस प्रशासन अशा समाजकंटकांवर काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा मनसेकडून निषेध

उल्हासनगर वरून मुंबई ही १ तासावर आणण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. उल्हासनगरमध्ये मेट्रो रेल्वे स्थानकाचे नाव सिंधूनगर असेल, असे बुधवारी पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सिंधुनगर या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. उल्हासनगरमधील मनसेने काळे कपडे परिधान करून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

- Advertisement -

मराठी विरुद्ध सिंधी वाद पेटणार

मात्र समाज माध्यमांवर काही समाजकंटकांनी मुख्यमंत्री फडणवीस हे उल्हासनगर शहराचे नाव सिंधूनगर करणार असल्याचे पसरवू लागले. त्यामुळे उल्हासनगर शहरात सिंधी विरुद्ध मराठी असा वाद पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना विचारले असता त्यांनी थेट भाजपाला धमकी देऊन टाकली. भाजपा उमेदवार कुमार आयलानी हे त्यांची भूमिका स्पष्ट करीत नाहीत, तो पर्यंत प्रचार बंद करणार असल्याचे सांगितले. मात्र याबाबत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी असे काही नसून उल्हासनगरमध्ये सिंधी आणि मराठी हे दोघेही समाज एकत्र नांदत असल्याचे सांगत कुमार आयलानी यांचा प्रचार जोरात चालू असल्याचे सांगितले.

विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्या – आयलानी

याबाबत भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांनी सांगितले की, “उल्हासनगर हे १३ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेले शहर आहे. प्रत्येक पाऊण किलोमीटरवर मेट्रोचे एक रेल्वे स्टेशन असते. म्हणजेच उल्हासनगर शहरातून मेट्रो गेल्यास उल्हासनगर मध्ये कमीत कमी ५ ते ६ मेट्रोची रेल्वे स्थानक असतील. त्यापैकी एकाचे नाव सिंधूनगर असेल. इतर रेल्वे स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या नावाने ही असू शकतील,” असे आयलानी म्हणाले. त्यामुळे असा वाद घालण्याऐवजी मेट्रो येणार असल्याच्या घोषणेचे स्वागत करून आणि त्यामुळे होणाऱ्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घ्या, असे आवाहन आयलानी यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -