घरताज्या घडामोडीकोयना, महाबळेश्वरची काळी चिंबोरी आली मार्केटला, किलोचा भाव माहितेय?

कोयना, महाबळेश्वरची काळी चिंबोरी आली मार्केटला, किलोचा भाव माहितेय?

Subscribe

मुंबईत खवय्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही ‘नॉन व्हेज’ लोकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यांच्यासाठी ओली मच्छी, सुकी मच्छी, चिकन, मटण हे बाराही महिने मिळते. मात्र या नॉन व्हेज वाल्यांमध्येही पावसाळ्यात मिळणाऱ्या ‘काळ्या चिंबोऱ्या’ खाणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. मुंबईत मोजक्याच ठिकाणी या चिंबोऱ्या विकल्या जातात. पूर्व उपनगरातील घाटकोपर ( प.), अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, सर्वोदय रुग्णालयाजवळील मनोरंजन हॉलच्या समोर या काळ्या चिंबोऱ्यांच्या विक्रीला याच आठवड्यात म्हणजे रविवारपासूनच सुरुवात झाली आहे. चिंबोरीवाला या चिंबोऱ्या महाबळेश्वर, कोयना धरण या परिसरातून तेथील स्थानिकांच्या मार्फत पकडून त्या विक्रीसाठी घाटकोपर येथे आणतो.

३०० रुपये एक किलो या दराने या चिंबोऱ्यांची विक्री करण्यात येते. यामध्ये लहान, मोठ्या आकाराच्या चिंबोऱ्या असतात. हा चिंबोरीवाला त्या चिंबोऱ्या प्लास्टिक गोणीत अथवा फळांच्या कॅरेटमध्ये बंदिस्त करून घाटकोपरला छोट्या टेम्पोद्वारे घेऊन सकाळी ५ नंतर धडकतो. दुपारपर्यंत त्याच्या चिंबोऱ्या बघता बघता लगेच पटापट विकल्या जातात. उशिरा जाणाऱ्या अगदी लहान चिंबोऱ्या वाट्याला येतात. खूप दूर अंतरावरून या चिंबोऱ्या आणण्यात येत असल्याने आणि त्या जरा मजबुतीला हलक्या असल्याने एकूण चिंबोऱ्यांपैकी १०% -१५% चिंबोऱ्या मृत पावतात. कधी कधी मोठ्या चिंबोऱ्यांच्या मारामारीत लहान चिंबोऱ्यांचा बळी जातो. मात्र चिंबोरीची चव दुसऱ्या कोणत्याही खाऱ्या पाण्यातील खेकडी, खाडीतील खेकडयाला, मच्छीला, मटण, चिकन यांना नाही. त्यामुळे नॉन व्हेज खवय्ये चिंबोरी दिसताच एकच गर्दी करतात आणि तुटून पडतात. एखादा नवखा व्यक्ती खेकड्यांकडे नुसता बघत बसला अथवा भाव कमी करण्याच्या भानगडीत पडला तर तोपर्यंत चिंबोऱ्यांची विक्री जोरात होऊन ‘तो’ नवखा बघतच बसतो.

- Advertisement -

काही खवय्ये तर चिंबोऱ्या खरेदीसाठी मुंबईतून ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, वांगणी अगदी खोपोलीपर्यंत प्रवास करतात आणि एकदाची चिंबोरीचे कालवण बनवून त्यावर मस्त ताव मारतात.

चिंबोरीचे कालवण जर काळ्या वाटणात बनवले तर ते जसजसे शिळे होत जाते तसंतसे त्या काळवणाची चव आणखीन वाढत जाते. चिंबोरी व्यवस्थित खाणाऱ्या खवय्याला जेवण आटोपायला किमान २० -३० मिनिटे कालावधी लागतो. त्यामुळे चिंबोऱ्यांची मजा दुसऱ्या कुठल्याही नॉन व्हेजमध्ये नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -